3 ते 5 फेब्रुवारीदरम्यान पुण्यात रंगणार सामने

0

नवी दिल्ली : अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेची अंतिम फेरी गाठलेला आणि दोन वेळचा ऑलिंपियन टेनिसपटू रोहन बोपण्णाला डेव्हिस करंडक संघातून वगळण्यात आले. महेश भूपतीची डेव्हिस चषकासाठी भारतीय संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुरुष टेनिसमधील वर्ल्डकप समजल्या जाणार्‍या या स्पर्धेतील भारताची आशिया/ओशिनिया गटातील लढत न्यूझीलंडविरुद्ध 3 ते 5 फेब्रुवारीदरम्यान पुण्यात होणार आहे. सध्या कर्णधार असलेले आनंद अमृतराज यांची ही शेवटची लढत असणार आहे. नॉन प्लेइंग कर्णधार म्हणून अमृतराज यांनाच कायम ठेवण्याची मागणी काही भारतीय खेळाडूंनी केली होती. मात्र याकडे दुर्लक्ष करीत भारतीय टेनिस महासंघाने भूपतीच्या नावावर शिक्कामोर्तब केले. न्यूझीलंडविरुद्ध लढतीसाठी भारतीय संघातून रोहन बोपन्नाला वगळण्यात आले आहे. स्पेनविरुद्ध लढतीत चांगली कामगिरी करणार्‍या लियांडर पेस आणि साकेत मयनानी यांचीच जोडी कायम ठेवण्याचा निर्णय निवड समितीने घेतला. एकेकीत साकेत आणि युकी भांबरी भारताचे आव्हान सादर करतील.

महाराष्ट्राची ठोंबरे संघात
निवड समितीने फेडरेशन करंडक स्पर्धेसाठी भारतीय संघ कायम ठेवला आहे. हा संघ तो संभाव्य असेल. या संघात महाराष्ट्राची ऑलिम्पिकपटू प्रार्थना ठोंबरेचा समावेश करण्यात आला आहे. या स्पर्धेतील आशिया-ओशियाना गट एकमधील सामन्यात भारत कझाकस्तानशी 6 फेब्रुवारीपासून खेळणार आहे. ही लढत अस्ताना येथे होईल. संघात सानिया मिर्झा, अंकिता रैना, स्नेहादेवी रेड्डी, कामरान थंडी, रिया भाटिया, प्रार्थन ठोंबरे यांचाही समावेश आहे.

संघ निवडीवर प्रश्नचिन्ह
अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेची अंतिम फेरी गाठलेला आणि दोन वेळचा ऑलिंपियन टेनिसपटू रोहन बोपण्णाला डेव्हिस करंडक संघातून वगळण्यात आले आहे. यावर क्रीडाक्षेत्रातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असून काहींनी संघ निवडीवर प्रश्नचिन्ह उभा केले आहे. भारतीय टेनिस संघटनेच्या एस. पी. मिश्रा, रोहित राजपाल, नंदन बाळ, झीशान अली आणि सचिव हिरोन्मय चॅटर्जी यांनी हा संघ निवडला. गेल्या डेव्हिस करंडक लढतीत स्पेनच्या रॅफेल नदाल आणि मार्क लोपेझ यांना झुंजविणाऱ्या लिअँडर पेस आणि साकेत मैनेनी या जोडीलाच दुहेरीत पसंती देण्यात आली आहे. या लढतीसाठी युकी भांब्रीलादेखील पुनरागमनाची संधी देण्यात आली. त्यामुळे साहजिकच सुमीत नागल याला वगळण्यात आले. संघात युकी, साकेत आणि रामकुमार रामनाथन असे एकेरीतील तीन खेळाडू असतील. संघातील पाचवा खेळाडू म्हणून प्रज्ञेश गुणेश्‍वरन याला संधी देण्यात आली आहे.