27 फुटीरांना अपात्रतेसाठी जमवले भक्कम पुरावे; निवडक नगरसेवकांसह दोन भगत भाजपाच्या मदतीला

जळगाव – जळगाव महापालिकेतील भाजपाच्या फुटीर 27 नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई होण्यासाठी पक्षातर्फे मनपातील गटनेते भगत बालाणी यांनी नाशिक विभागीय आयुक्तांकडे याचिका दाखल केली असून, एकूण 30 हजार पानांमधून पुरावे मांडण्यात आले आहेत. या याचिकेवर सुनावणीसाठी अद्याप पक्षाला तारीख मिळालेली नाही मात्र, फुटीरांना जात्यात आणण्यासाठी दोन भगत आणि भाजपातील काही नगरसेवक काम करत आहेत.

जळगाव महापालिकेच्या महापौर, उपमहापौरपदासाठी नुकतीच ऑनलाईन निवडणूक झाली. यावेळी शिवसेनेने स्वतःचे बहुमत नसतानाही भाजपचे 27 नगरसेवक फोडून महापौर, उपमहापौरपदी आपले उमेदवार निवडून आणले. यामुळे संपूर्ण राज्याच्या राजकरणात खळबळ उडाली. या प्रकरणात भाजपला नामुष्की पत्करावी लागली. यानंतर भाजपचे नेते आ. गिरीश महाजन यांनी या फुटीर नगरसेवकांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला होता.

फुटीर नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई होण्यासाठी भाजपतर्फे मनपातील गटनेते भगत बालाणी यांनी नाशिक विभागीय आयुक्तांकडे याचिका दाखल केली आहे. वकील म्हणून अ‍ॅड. सतीश भगत काम पाहत आहे. ही याचिका 30 हजार पानांची असून, त्यामध्ये फुटीर नगरसेवकांनी पक्षाचा व्हीप व इतर अनुषंगिक बाबींमध्ये कायद्याचे कसे उल्लंघन केले होते ? याचे पुरावे जोडण्यात आले आहेत.

महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक झाल्यापासून 15 दिवसांत याचिका दाखल करण्याचे आव्हान भाजपासमोर होते. त्यासाठी विशाल त्रिपाठी, अतुलसिंह हाडा, अ‍ॅड. शुचिता हाडा, जितेंद्र मराठे, राजेंद्र घुगे-पाटील, अश्‍विन सोनवणे, धीरण सोनवणे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यांनी चोखपणे सर्व पुरावे, कागदपत्रे जमा करण्याचे काम केले.

निकालाच्या दिवसापासून सहा वर्ष अपात्र
याचिकेनुसार संबंधित नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई ज्या दिवशी होईल त्या दिवसापासून पुढील सहा वर्ष त्यांना निवडणूक लढवता येणार नाही, अशी माहिती अतुलसिंह हाडा यांनी दिली. याचिकेत जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांनाही प्रतिवादी करण्यात आल्याचे जितेंद्र मराठे यांनी सांगितले.

आ. गिरीश महाजन पश्‍चिम बंगाल दौर्‍यावर
दरम्यान, भाजपाचे नेते आ. गिरीश महाजन यांची कोरोना टेस्ट निगेटीव्ह येताच ते पश्‍चिम बंगालच्या दौर्‍यावर रवाना झाले आहेत. विधानसभा निवडणुकीत पक्षाने सोपवलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी तेथे जात असल्याचे आ. महाजन यांनी जनशक्तीशी बोलतांना सांगितले.