26 मे रोजी प्रदर्शित होणार ‘सचिन-अ बिलियन ड्रीम्स’ चित्रपट

0

मुंबई : क्रिकेटचा देव अशी ओळख असणारा सचिन तेंडूलकर आता एका नव्या रुपात चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या आयुष्यावर बनलेल्या ‘सचिन-अ बिलियन ड्रीम्स’ हा चित्रपट मे महिन्यात रिलीज होणार असून सचिनने या बद्दल माहिती चाहत्यांना दिली आहे. भारतीय क्रिकेट जगतात धावांचा विक्रमी डोंगर रचणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या जीवनावरील चित्रपट ‘सचिन- अ बिलियन ड्रीम्स’ येत्या २६ मे ला प्रदर्शित होणार आहे. नुकतीच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित झाली आहे.

मी प्रचंड आनंदी

विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तिंच्या जीवनावर, त्या क्षेत्रातील त्यांच्या कारकिर्दीवर प्रकाश टाकणारे बरेच चित्रपट सध्या हिंदी चित्रपट सृष्टीत प्रदर्शित होत आहेत. या प्रकारच्या चित्रपटांना मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसादही वाखाणण्याजोगा आहे. लवकरच असाच एक वास्तवदर्शी जीवनपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेच त्याच्या फेसबुक अकाऊंटद्वारे एक पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. यावेळी मी प्रचंड आनंदी असल्याचे देखील मास्टर ब्लास्टरने सांगितले आहे.

तारीख राखून ठेवा

‘गेल्या बऱ्याच काळापासून मला सर्वजण जो प्रश्न विचारत होते हे आहे त्याचे उत्तर. ही तारीख राखून ठेवा..’ असे कॅप्शन देत सचिनने त्याच्या फेसबुक अकाऊंटवर या चित्रपटासंबंधीचे एक पोस्टरही शेअर केले आहे. अतिशय लक्षवेधी अशा या पोस्टरमध्ये सचिनचा हात दिसत असून त्याच्या हातात एक बॅट आहे, ज्यावर तिरंग्याच्या रंगातील ग्रीप पाहायला मिळत आहे. या पोस्टरमध्ये ‘सचिन तेंडुलकर स्टॅंड’मध्ये होत असलेल्या चाहत्यांच्या कल्ल्याचीही झलक पाहायला मिळत आहे.

सचिनची भूमिका कुणी केली?

सर्वसामान्य मराठी कुटुंबातून आलेल्या सचिनचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर बनण्यापर्यंतचा प्रवास या चित्रपटात दाखविण्यात येणार असून या चित्रपटामध्ये सचिनच्या भूमिकेत कोण दिसणार यावरुन मात्र पडदा उचलण्यात आलेला नाही. त्यामुळे लाडक्या सचिनची भूमिका रुपेरी पडद्यावर कोण साकारणार हे जाणून घेण्यासाठी आता प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. सचिनची भूमिका कोण करत आहे? हा मात्र सवाल अद्याप अनुत्तरिय आहे. या चित्रपटाला ए. आर. रेहमानच्या संगीताची जोड असल्यामुळे ही या चित्रपटाची जमेची बाजू ठरु शकते असे म्हणायला हरकत नाही.

टीझर झाला आहे रिलीज

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या आयुष्यावर आधारित असलेल्या ‘सचिन- अ बिलियन ड्रीम्स’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचा टीझर बऱ्याच दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला असून, त्यास चाहत्यांचा दमदार प्रतिसाद मिळत होता. ‘२०० नॉट आऊट’ या प्रोडक्शन कंपनीने हा चित्रपट तयार केला असून सुप्रसिद्ध दिग्दर्शक जेम्स अर्सकाईन यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. हा चित्रपट आजवरच्या अशा स्वरूपातील सिनेमांचे सर्व रेकॉर्ड मोडेल अशी शक्यता माध्यमातील तज्ञ व्यक्त करत आहेत.