259 कुटुंबांची धुरापासून सुटका

0

रावेर । शासनाने ग्रामीण भागातील महिलांना चुलीच्या धुरापासून होणारा त्रास व आजार यातून सुटका करण्यासाठी प्रधानमंत्री उज्वला योजना राबविली असून याद्वारे प्रत्येक कुटुंबाला गॅस कनेक्शन दिले जात आहे. या योजनेंतर्गत रावेर परिसरातील 259 कुटुंबांना याचा लाभ मिळाला असून या कुटुंबातील महिलांना चुलीच्या धुरापासून मुक्ती मिळाली आहे.

केंद्र शासनाने गरीब कुटुंबांकडे गॅस कनेक्शन मिळण्याकरीता ही योजना अंमलात आणली आहे. अनेक कुटूंब याचा फायदादेखील घेत आहे. परंतु रोगापेक्षा इलाज महाग यासारखी अवस्था उज्वला योजनेची झाली आहे. एलपीजीने ग्रामीण व शहरी भागासाठी मागील काही काळात केलेल्या सर्वेक्षणात ज्यांचे नाव आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळत आहे. त्यामुळे इतर गरजू कुटूंब या योजनेपासून वंचित राहत असल्याचे दिसून येत आहे.

कागदपत्रांची अडचण
केंद्र शासन गरीब कुटुंबांना गॅस कनेक्शन देत आहे परंतु आजही शहरी व ग्रामीण भागात असे अनेक कुटुंबे आहेत ज्यांच्याकडे दारिद्रयाचे दाखले नसून देखील अठरा विश्‍व दारिद्रयात चूल फुकत आपल्या संसाराचे गाडे हाकावे लागते. मात्र या योजनेसाठी अर्ज केल्यास संबंधित अधिकारी या लाभार्थ्यांना दारिद्ˆय रेषेखाली येत असल्याचे प्रमाणपत्राची मागणी करीत आहे.

2 हजार 55 कनेक्शन प्रस्तावित
रावेर परिसरात उज्वला योजनेंतर्गत 259 कुटुंबांना कनेक्शन देण्यात आले आहे तर 2 हजार 55 कुटुंबांचे कनेक्शन अजून देण्याचे बाकी आहे. शासनाने याकडे गांभिर्याने लक्ष देवून बाकी असलेल्या कनेक्शनना ताबडतोब वितरित करण्याची आवश्यकता आहे.

या बाबींची पुर्तता आवश्यक
या योजनेंतर्गत गॅस कनेक्शनचा लाभ मिळविण्यासाठी शहरी जनतेला 2011 च्या दारिद्रय सर्वेक्षणाचा दाखला तर ग्रामीण जनतेला 2004 चा दारिद्रय सर्वेक्षणाचा दाखला तसेच आधार कार्ड, बँकेचे पासबुक आणि दोन फोटो दिल्यानंतरच कनेक्शन मिळणार आहे.

अटी शिथील कराव्यात
नागरिकांना या योजनेचा लाभ घेण्यास अडचणी येत असल्यामुळे अशा कुटुंबांना कोणत्या निकषावर गॅस कनेक्शन मिळणार आणि त्यांच्या जीवनातील धूर कधी कमी होणार, हादेखील प्रश्‍न आहे. यासाठी शासनाने कागदपत्रांसंदर्भात काही अटी शिथील करुन यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी होत आहे.

जनजागृती करण्याची गरज
रावेर तालुका हा ग्रामीण भागात मोडत असल्यामुळे येथील बहुतांश नागरिक शेतात मोलमजुरी करुन आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चालवित असतात. त्यामुळे ग्रामीण भागातील कुटूंबांमध्ये दैनंदिन भोजन हे चुलीवर करण्यात येत असते. साधारणत: ग्रामीण महिलांना चुलीच्या धुरामुळे श्‍वसन विकाराचे आजार जडत असल्याचा अहवाल काही स्वयंसेवी तसेच वैद्यकिय संस्थांनी जाहीर केला आहे. त्यामुळे शासनाने या महिलांना चुलीपासून सुटका करण्यासाठी अशा गरजू कुटूबांना गॅस कनेक्शनचा लाभ या योजनेच्या माध्यमातून मिळवून दिला जात आहे. बहुतांश नागरिकांना या योजनेची अजूनही माहिती नसल्यामुळे याबाबत शासनातर्फे जनजागृती करण्याची आवश्यकता असल्याचे दिसून येत आहे.