आश्रम शाळेच्या स्वयंपाकी महिलेचे न्यायासाठी उपोषण

0

चाळीसगाव । तालुक्यातील कोंगानगर वाघले तांडा येथील प्राथमिक आश्रम शाळेने महिलेला सन 2000 पासून स्वयंपाकी पदावर रीतसर नियुक्ती पत्र दिलेले असतांना त्या महिलेला आज पावेतो मान्यता मिळाली नाही व पगार मिळाला नाही. वारंवार मागणी करून व पाठपुरावा करून देखील न्याय मिळत नसल्याने तालुक्यातील वाघले येथील या महिलेने त्यांचे अपंग पती व भारतीय समाज सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ओंकार जाधव यांचेसह 1 मे महाराष्ट्र व कामगार दिनापासून चाळीसगाव तहसीलसमोर आमरण उपोषण सुरु केले आहे.

आमरण उपोषण सुरु करण्यापूर्वी अर्जदार बिजाबाई पुंडलिक राठोड (रा. वाघले ता चाळीसगाव) यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वाघली कोंगानगर प्राथमिक आश्रम शाळा येथे रीतसर स्वयंपाकी पदावर 2 जुलै 2012 रोजी पासून काम करीत आहेत मात्र त्यांना अद्यापपर्यंत मान्यता व पगार देखील मिळाला नाही. याबाबा त्यांनी संबंधित शासकीय अधिकारी, संबंधित विभागाचे मंत्री याना पाठपुरावा केला, मात्र त्यांना न्याय मिळाला नाही. यासाठी वारंवार मंत्र्यांपर्यंत निवेदन देण्यात आले आहे. तसेच प्रस्तावास पत्र व्यवहार करूनही त्यांचे अपंग पती, मुलांचा व कुटुंबीयांचा काही एक विचार न करता साधे पत्रांचे उत्तर देखील दिले नाही व विचारपूस देखील केली नाही म्हणून त्यांच्या कुटुंबीयांनी जीवन कसे जगावे, पगार नाही, उत्पन्नाचे साधन नाही, 1 हेक्टर जमीन होती ती विकून आज पावेतो उदरनिर्वाह केला आहे म्हणून न्यायासाठी लढा देण्यासाठी दाम्पत्याने उपोषणास सुरूवात केली.