24 तास मुबलक पाणीपुरवठ्यासाठी नवीन वाढीव पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव

0

वरणगाव नगराध्यक्ष सुनील काळे यांची माहिती ; पुण्याच्या कंपनीकडून प्रस्ताव सुपूर्द

वरणगाव- शहरातील नागरीकांना 24 तास शुद्ध मुबलक पाणीपुरवठा तसेच भूमिगत गटारी तयार करण्यासाठी नवीन वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या प्रस्तावाला पालिकेच्या बैठकीत सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. या प्रस्तावाला 58 कोटी रुपये खर्च आहेत. हा प्रस्ताव लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न करून शहराला मुबलक पाणीपुरवठा देणार असल्याचे काळे म्हणाले.

पुण्याच्या कंपनीकडून सर्वेक्षण
शहराचा वाढता विस्तार व पाण्याची समस्या पाहता तसेच सांडपाण्याची व्यवस्था करण्यासाठी भूमिगत गटारे तयार करण्यात यावा यासाठी शहरात दरडोई पाणीपुरवठा वाढवणे गरजेचे असल्याने शहरात नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी सर्वानुमते मंजुरी देण्यात आली आहे. ही योजना तांत्रिक मान्यतेसाठी नाशिक येथे पाठविण्यात येणार आहे. सध्या 40 लिटर प्रतिव्यक्ती पाणीपुरवठा होत आहे. भूमिगत गटारांसाठी हे पाणी 135 लिटर प्रति व्यक्ती पुरवणे गरजेचे असल्याने तसेच सात मीटर उंचीवर म्हणजेच दुसर्‍या मजल्यावर सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी नवीन वाढीव पाणीपुरवठा योजना तयार करण्याबाबत पुणे येथील कंपनीला कळवण्यात आले होते. त्यांनी शहराचे सर्वेक्षण करून नवीन पाणीपुरवठा जलवाहिनी तसेच अंतर्गत जलवाहिनी त्याचप्रमाणे सहा नवीन जलकुंभ शुद्धीकरण केंद्र येथे अतिरीक्त दोन जलकुंभ यासह 2050 ची लोकसंख्या लक्षात घेऊन हा प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावामुळे शहरातील भूमिगत गटारींचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

कंपनीकडून पालिकेला प्रस्ताव सुपूर्द
सदरचा प्रस्ताव संबंधीत कंपनीने नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाक, मुख्याधिकारी सौरभ जोशी, नगरसेवक राजेंद्र चौधरी, माला मेढे, अरुणा इंगळे, नसरीन कुरेशी, मेहनाज बी.पिंजारी, गणेश चौधरी, नितीन माळी, शशी कोलते, वैशाली देशमुख, जागृती बढे, रोहिणी जावळे, पाणीपुरवठा अभियंता गणेश चाटे यांच्या उपस्थितीमध्ये पालिकेला सुपूर्दू केला.

शहराला होणार चोवीस तास पाणीपुरवठा
ही योजना कार्यान्वित झाल्यानंतर प्रत्येक कुटुंबाला 24 तास पाणीपुरवठा होणार आहे परंतु शुद्ध पाणीपुरवठा करताना प्रत्येक कुटुंबासाठी मीटर लावण्यात येईल यामुळे पाण्याची बचतदेखील या ठिकाणी होणार आहे. सात मीटर उंचीवर पाणीपुरवठा होणार असल्याने विजेची बचतदेखील या ठिकाणी होईल तसेच भूमिगत गटारी तयार करण्याचा प्रश्न सुटणार असल्याचे नगराध्यक्ष सुनील काळे यांनी ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना सांगितले.

Copy