शहाद्यानजीक भीषण अपघात : पाच ऊस तोड मजूर ठार

मृतांमध्ये माय-लेकींचा समावेश : अपघातात 12 जण जखमी

Accident Of Bus And Tempo In Shahada City 5 Passed Away 12 Injured शहादा : शहादा शहराबाहेरून जाणार्‍या खेतिया बायपास रस्त्यावरील मीरा प्रताप लॉनजवळ गुजरात व मध्य प्रदेशात आदिवासी मजुरांना घेऊन जाणार्‍या आयशर ट्रक व खाजगी ट्रॅव्हल्स बसमध्ये झालेल्या भीषण अपघातात पाच जण ठार झाले तर 12 जण जखमी झाले. हा अपघात गुरुवार, 29 रोजी दुपारी तीन वाजता घडला. मृतांमध्ये माय लेकीचा समावेश असून अपघातात ठार झालेले पाचही जण पाडळदा, तालुका शहादा येथील रहिवासी आहेत.

भीषण अपघाताने हळहळ
गुरुवारी दुपारी तीन वाजता आयशर ट्रक (क्रमांक एम.एच.18 ए.ए.9853) हा आदिवासी मजुरांना घेऊन गुजरात राज्यात शहराबाहेरील बायपास रस्त्याने जात असतांना समोरून मध्यप्रदेशात खेतीयाकडे आदिवासी मजूर घेऊन जाणार्‍या खाजगी ट्रॅव्हल्स बस (क्रमांक जी.जे.03 एक्स 0198) मध्ये समोरासमोर धडक झाली. त्यात तीन जण जागीच व दोन जण रुग्णालयात उपचार घेत असतांना मयत झाले तर दहा जण गंभीर जखमी झाले. सर्वाधिक जखमी झालेले मजुर हे आयशर ट्रकमधील आहेत. खासगी ट्रॅव्हल्स बस व आयशरट्रक यांच्यात अपघात झाल्यानंतर आयशरट्रक रस्त्याच्या बाजूला पलटी झाला त्यामुळे आयशर ट्रक मधील मजूर अक्षरशाः रस्त्याच्या बाजूला फेकले गेले.

जखमींना सहकार्‍यांनीच काढले बाहेर
अपघात झाल्यानंतर मजुर किंकाळ्या मारत होते. अपघातातून वाचलेले मजूरच आपल्या सहकारी मजुरांना बाहेर काढत होते. जवळच असलेल्या वसाहतीतील नागरीकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना बाहेर काढण्यासाठी मदत केली. अनेक मजूर रस्त्यावर पडलेले होते. रक्ताचा सडा पडलेला होता. दोन्ही वाहनांच्या तुटलेले काच रस्त्यात पडलेले होते. मदतीसाठी आलेल्या नागरिीांच्या गर्दीमुळे रहदारी अर्धा तासापेक्षा जास्त वेळ ठप्प झाली होती. पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र मोरे, पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र पाटील आपल्या पोलिस कर्मचार्‍यांसह घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी नगरपालिका रुग्णालय व खाजगी रुग्णालयात पाठविले. पोलिसांनी नंतर रहदारी सुरळीत केली. गेल्या पंधरा दिवसापासून हजारो आदिवासी मजूर परप्रांतात स्थलांतरीत होत आहेत.

महावीर पतसंस्थेच्या रुग्णवाहिकेने हलवले जखमींना
जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी शासकीय रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने महावीर पतसंस्थेच्या दोन रुग्णवाहिकांनी जखमींना नेण्यासाठी मोठी मदत केली. शिवाय सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील मोठी मदत केली. घटनास्थळाजवळच नव्याने बांधण्यात आलेले ग्रामीण रुग्णालय असताना ते सुरू न झाल्याने त्याचा उपयोग झाला नाही. याची चर्चा अपघाताच्या ठिकाणी होत होती.

यांचा मृतांमध्ये समावेश
अपघातात ठार झालेल्यांमध्ये प्रमिला किशोर भील (50), उर्मिला किशोर भिल (5), करण अशोक भिल (35), सुमती अशोक पाडवी, रमणबाई अखेराज भिल (सर्व रा.पाडळदा, ता.शहादा) यांचा समावेश आहे. तर जखमींमध्ये आशा नाईक ( 45), शहानूबाई ठाकरे (50), संदीप भिल (18), वर्षा नाईक (8), अनिल सुभाष नाईक (45), सोन्या जतन वळवी (28, अलखेड), शकीला छगन ठाकरे (25), सखू छगन भिल (18), लाडकी दामू ठाकरे (60, सर्व रा.शेल्टी), कार्तिक सुदाम बागुल (वय 20) वडछिल यांचा समावेश आहे.