Private Advt

लाच भोवली : नंदुरबार एसीबीच्या जाळ्यात अडकले दोन वायरमन

नंदुरबार : शेतातील वीज कनेक्शनसाठी डिमांड नोट काढण्यासाठी लाचेसह 30 हजार मागून तडजोडीअंती 27 हजार 500 रुपयांची लाच स्विकारताना खाजगी वायरमन देवानंद उर्फ देवा पंडित मराठे (रा.रजाळे, ता.जि.नंदुरबार) व वीज कंपनीचे टेक्निशीयन अनिल मांगडू भोये (रा.प्लॉट नं.1, सिध्देश्वर नगर, कोकणीहिल, दुधाळे शिवार, ता.जि.नंदुरबार) यांना नंदुरबार एसीबीच्या पथकाने नंदुरबार मध्यवर्ती बसस्थानकातच अटक केली.

लाचखोर तंत्रज्ञ एसीबीच्या जाळ्यात
36 वर्षीय तक्रारदार यांच भोणे, ता.नंदुरबार शिवारात शेत आहे. शेतात वीज कनेक्शन घ्यावयाचे असल्याने तक्रारदाराने महावितरणच्या नंदुरबार येथील कार्यालयात ऑक्टोबर 2021 मध्ये डिमांड नोटसाठी ऑनलाईन अर्ज केला होता. त्यानंतर तक्रारदार यांनी वारंवार वीज वितरण कार्यालयाशी संपर्क साधला असता वायरमन अनिल मांगडू भोये यांनी खाजगी वायरमन देवा मराठे यांच्यामार्फत 30 हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती 27 हजार 500 रुपये देण्याचे ठरले. तक्रारदाराने तक्रार नोंदवल्यानंतर 1 जून रोजी लाचेची पडताळणी करण्यात आली. शनिवारी 15 हजार रुपयांची डिमांड नोट व 12 हजार 500 रुपये लाच घेताना भोये यास अटक केल्यानंतर मराठे यासही अटक करण्यात आली.

यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा नंदुरबार एसीबीचे पोलिस उपअधीक्षक राकेश चौधरी, पोलिस निरीक्षक समाधान वाघ, पोलिस निरीक्षक माधवी वाघ, हवालदार विजय ठाकरे, विजय ठाकरे, ज्योती पाटील, अमोल मराठे, देवराम गावीत, मनोज अहिरे, संदीप नावाडेकर, देवराम गावीत, चालक जितेंद्र महाले आदींच्या पथकाने यशस्वी केला.