Private Advt

पत्नी माहेरी येत नसल्याने सुरू होते भांडण ; मध्यस्थी करण्यासाठी सासु येताच जावयाने केला खून

घोटी : दाम्पत्याच्या कडाक्याच्या भांडणानंतर मध्यस्थीसाठी सरसावलेल्या सासुचाच संतप्त जावयाने पोटात कात्री मारून खून केला. या घटनेत पत्नी आणि एक अल्पवयीन मुलगी गंभीर जखमी झाली. ही घटना त्र्यंबकेश्वर सीमेवरील झारवड येथे रविवारी सकाळी घडली. ग्रामस्थांनी पकडून ठेवलेल्या जावयास पोलिसांनी ताब्यात देऊन त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

कौटुंबिक वादात गेला सासूचा बळी
इगतपुरी-त्रंबकेश्वर तालुक्याच्या सरहद्दीवर असलेल्या झारवड, जोशीवाडी येथे रविवारी सकाळी 9. 30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यात कमळाबाई सोमा भुतांबरे (55, रा.जोशीवाडी, झारवड, ता.त्र्यंबकेश्वर) ही वृद्ध महिला जागीच ठार झाली. इंदुबाई किसन पारधी (36, रा.कळमुस्ते, जांभूळवाडी, ता.त्र्यंबकेश्वर) ही विवाहित महिला आपली 12 वर्षीय मुलगी माधुरी हिस सोबत घेऊन काही दिवसांपूर्वी माहेरी झारवड येथे आली होती. दरम्यान, पतीला दारूचे व्यसन असल्याने ती सासरी जाण्यास टाळाटाळ करत होती. रविवारी सासरी आलेल्या जावयाने सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास पत्नीला घरी येण्याबाबत आग्रह केला. याचदरम्यान पती-पत्नीत भांडण झाले. यावेळी पती किसन महादू पारधी (42, रा.कळमुस्ते, जांभूळवाडी, ता.त्र्यंबकेश्वर) याचा राग अनावर झाला. त्याने विळ्याने पत्नी इंदुबाई हिस मारहाण करण्यास सुरुवात केली. या दरम्यान, सासू कमळाबाई व मुलगी माधुरी पारधी या भांडण सोडविण्यास गेल्या असता, किसन पारधी याने कमळाबाई यांच्या पोटात व पाठीवर कात्रीने भोसकून वार केले. त्यात कमळाबाई गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.

सतर्क ग्रामस्थांनी आरोपी जावयास पकडले
या घटनेबाबत आरडाओरड होताच परीसरातील नागरीकांनी धाव घेऊन संशयित किसन महादू पारधी यास पकडून ठेवले व घोटी पोलिसांना खबर दिली. जखमी अवस्थेत पडलेल्या इंदुबाई व माधुरी यांना तत्काळ उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले.

खुनाचा गुन्हा दाखल
घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी कांगणे, उपविभागीय पोलिस अधिकारी कविता फडतरे, घोटीचे सहायक पोलिस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची व परिस्थितीची माहिती घेऊन तपास कामी सूचना दिल्या. घोटी पोलिसांनी बाळा निवृत्ती भुतांबरे (27) याच्या फिर्यादीवरून संशयित किसन महादू पारधी याच्याविरुद्ध खून, जीवे मारण्याचा प्रयत्न आदी कलमांखाली गुन्हा दाखल करून अटक केली आहे.