Private Advt

ओझरच्या शेतकर्‍याला सव्वा चार लाखांचा गंडा : भामट्या व्यापार्‍याविरोधात गुन्हा

चाळीसगाव : तालुक्यातील ओझर येथील एका शेतकर्‍याची 44 क्विंटल कापसाची खरेदी केल्यानंतर पैसे देण्यास नकार देणार्‍या भामट्याविरोधात चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

चाळीसगाव पोलिसात गुन्हा
तालुक्यातील ओझर येथील कमलाकर उखा गुजर (48) हे शेतकरी असून त्यांनी यंदा कापूस लागवड केली होती. गुजर यांनी कापसाची विक्री करण्यासाठी प्रवीण सुभाष देशमुख (शिवशक्ती नगर, टाकळी प्र.चा.) यांना विचारणा केली असता त्यांनी कापूस नऊ हजार 600 रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करण्यासाठी होकार दिला. त्यानुसार प्रवीण सुभाष देशमुख यांनी गुजर यांच्याकडून 25 जानेवारी व 26 जानेवारी 2022 अशा दोन दिवसात 44.98 क्विंटल वजनाचा व चार लाख 311 हजार 424 रुपये किंमतीच्या कापसाची खरेदी केली. खरेदी केल्यानंतर देशमुखांनी दोन-तीन दिवसात पैसे देण्याचे सांगितले. त्यानंतर गुजरने प्रवीण देशमुखांकडे पैशाची मागणी केली. देशमुखांनी दोन -तीन वेळा गुजरला चेक दिले परंतु सदर चेकचा अनादर झाल्याने खात्यावर पैसे वर्ग होऊ शकले नाही. फसवणूक झाल्याची खात्री झाल्यावर त्यांनी चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात तक्रार दिल्यानंतर प्रवीण देशमुख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. तपास पोलिस निरीक्षक के.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.