Private Advt

जळगावातील लाच प्रकरण : खाजगी पंटराला एका दिवसांची पोलिस कोठडी

जळगाव : रेशनकार्डाची दुय्यम प्रत तयार करून देण्यासाठी चारशे रुपयांची लाच मागून ती स्वीकारणार्‍या खाजगी इसमाला जळगाव एसीबीच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास अटक केली होती. संशयीत पराग पुरुषोत्तम सोनवणे (39, रा.खोटे नगर, जळगाव ता.जि.जळगाव) यास जळगाव न्यायालयात हजर केले असता त्यास एका दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

जळगावच्या पुरवठा विभागाला दलालांचा डेरा
जळगावातील पुरवठा विभागाविषयी थेट अधिवेशनात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्‍न उपस्थित केला होता मात्र अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी या प्रश्‍नाला हे खरे नसल्याचे उत्तर दिले होते तर त्यानंतरही दलालांचा त्रास कमी झाला नसल्याने लाच प्रकरणातून पुन्हा दिसून आले आहे. लाच दिल्याशिवाय सर्वसामान्यांची कामे होत नसल्याने आता वरीष्ठ अधिकार्‍यांनी लाचखोरांचा बंदोबस्त करण्याची अपेक्षा आहे.

लाच प्रकरणात अनेकांच्या वाढल्या अडचणी
रेशनकार्डची दुय्यम नविन प्रत मिळण्यासाठी सोनवणे याने चारशे रुपयांची लाच मागितली असलीतरी या प्रकरणात निश्‍चितच साखळी असल्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे एसीबीच्या पथकाने आरोपीला दोन दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती मात्र न्यायालयाने एका दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस कोठडीत आरोपीचे पुरवठा विभागाच्या नेमक्या कोणत्या अधिकारी व कर्मचार्‍यांशी साटेलोटे होते या बाबीचा उलगडा होणार आहे. या प्रकरणात जेे कोणी दोषी असतील त्यांच्यावर निश्‍चितपणे कारवाई होईल, असे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांनी सांगितले. तपास पोलिस निरीक्षक एन.एन.जाधव करीत आहेत.