Private Advt

लाचखोर लिपिकासह पंटर नंदुरबार एसीबीच्या जाळ्यात

एक हजारांची लाच भोवली : तहसील कार्यालयाच्या आवारातच सापळा यशस्वी

नंदुरबार : सॉल्व्हन्सी प्रमाणपत्र देण्यासाठी एक हजारांची लाच मागणी करणार्‍या शहादा तहसील कार्यालयातील लिपिकासह खाजगी पंटराला लाच स्वीकारताच नंदुरबार एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. शुक्रवार, 13 रोजी शहादा तहसील कार्यालयाच्या आवारातच हा सापळा यशस्वी झाल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली. पंकज दिगंबर आयलापूरकर (32) असे अटकेतील लिपिकाचे तर कृष्णा सुदाम जगदेव (43, रा.भादे, ता.शहादा, जि.नंदुरबार) असे खाजगी पंटराचे नाव आहे.

एक हजारांची लाच भोवली
36 वर्षीय तक्रारदार यांचे नातेवाईक यांच्या विरोधात एका प्रकरणात गुन्हा दाखल असून ते सध्या नंदुरबार जिल्हा कारागृहात अटकेत आहेत. तक्रारदार यांच्या नातेवाईकांचा जामीन करण्यासाठी त्यांना सॉल्व्हन्सी प्रमाणपत्राची आवश्यकता आहे. तक्रारदार यांनी सॉल्व्हन्सी प्रमाणपत्र मिळण्यासाठी तहसील कार्यालय शहादा येथे अर्ज केला असता लिपिक पंकज आयलापूरकर यांनी प्रमाणपत्र देण्याच्या कामात मदत करण्याच्या मोबदल्यात एक हजार रुपये लाच शुक्रवारी मागितली होती. तक्रारदाराने नंदुरबार एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर लाच पडताळणी करून सापळा रचण्यात आला. आरोपीच्या वतीने खाजगी पंटराने लाच स्वीकारताच लिपिकास तहसील कार्यालयातून अटक करण्यात आली.

यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा नंदुरबार एसीबीचे पोलिस उपअधीक्षक राकेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक माधवी समाधान वाघ,
पोलिस निरीक्षक समाधान वाघ, विलास पाटील, अमोल मराठे, ज्योती पाटील, विजय ठाकरे, संदीप नावाडेकर, देवराम गावीत व जितेंद्र महाले आदींच्या पथकाने यशस्वी केला.