Private Advt

जळगावातील त्या तरुणाचा खूनच : तिघा संशयीतांना अटक

खून प्रकरणाला अनैतिक संबंधाची किनार : शहर पोलिसात खुनाचा गुन्हा
जळगाव : शहरातील गोलाणी मार्केटच्या तिसर्‍या मजल्यावरुन पडून मुकेश रमेश राजपूत (32, रा. नाथवाडा) या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास घडली होती मात्र हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय कुटुंबियांनी व्यक्त केल्यानंतर सीसीटीव्हीची तपासणी केली असता त्यात मुकेशला दोघे तिसर्‍या मजल्यावरून फेकताना आढळल्याने पोलिसांनी बुधवारी दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. अमर उर्फ लखन शांताराम बारोट (29, रा.कासमवाडी, रचना कॉलनी), पराग उर्फ बबलू रवींद्र आरखे (23, न्य सम्राट कॉलनी) अशी अटकेतील संशयीतांची नावे आहेत. दरम्यान, या खुनाला अनैतिक संबंधाची किनार असून अटकेतील संशयीतांनी निखील राजेश सोनवणे (22, कुसुंबा, ता.जळगाव) याच्या सांगण्यावरून मुकेशला ढकलल्याची कबुली दिल्याने निखील यास अटक करण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

तिसर्‍या मजल्यावरून पडताच तरुणाचा मृत्यू
शहरातील खाऊ गल्लीतील मुकेश राजपूत हा चायनीजच्या गाडीवर कामाला होता. सोमवारी काम आटोपून नेहमीप्रमाणे तो घरी गेला मात्र अमर ऊर्फ लखन व पराग ऊर्फ बबलू या दोघांनी मुकेशला पार्टी करायची असे सांगत घरुन बोलावले. त्यानंतर दाणाबाजारातून बिर्यानी व दारु घेतल्यानंतर तिघेही दारु पिण्यासाठी गोलाणी मार्केटच्या तिसर्‍या मजल्यावर गेले. याठिकाणी दारु पितांना अमर व पराग या दोघांनी मुकेश सोबत वाद घातला. हमरीतुमरी झाल्यावर दोघांनी मुकेशला तिसर्‍या मजल्यावरुन ढकलून दिले होते. यात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मुकेशचा जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणी सीएमओ डॉ.अजय सोनवणे यांच्या खबरीवरून शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली मात्र मयत मुकेशच्या नातेवाईकांनी त्याचा अपघात नसून त्याच्यासोबत घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला होता.

सीसीटीव्ही फुटेजवरून उलगडा
शहर पोलिसांनी गोलाणी मार्केट येथील सीसीटीव्ही कॅमेर्‍याची तपासणी करतांना एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात मुकेशला दोन जण फेकताना कैद झाल्याचे समोर आले. गुन्हे शोध पथकातील भास्कर ठाकरे यांनी सीसीटीव्ही फुटेजमधील संशयीत हे एमआयडीसी हद्दीतील असल्याचे कळताच त्यांनी खबरे कामाला लावले. खबर्‍याने दोघेही संशयीत सम्राट कॉलनीत असल्याची पक्की खबर दिल्यानंतर भास्कर ठाकरे यांनी तत्काळ दुचाकीवरुन घटनास्थळ गाठत अमर ऊर्फ लखन व पराग ऊर्फ बबलू या दोघांना ताब्यात घेतले. पोलिस निरीक्षक विजयसिंग ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विजय निकुंभ, उमेश भांडारकर, योगेश पाटील, गजानन बडगुजर, रतन गिते, प्रफुल्ल धांडे, प्रणेश ठाकूर यांच्या पथकाने संशयितांना पोलिस वाहनातून शहर पोलीस ठाण्यात आणले.

दोघांविरोधात खुनाचा गुन्हा
सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा, पोलिस निरीक्षक विजय ठाकूरवाड यांच्यासह पथकाने विचारपूस केल्यानंतर अमर व पराग या दोघांनी निखील रमेश सोनवणे यांच्या सांगण्यावरुन मुकेशला मारल्याची कबूली दिली आहे. या प्रकरणी सहाय्यक फौजदार संजय शंकर बडगुजर यांनी जळगाव शहर पोलिसात फिर्याद दिल्यावरून दोघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुन प्रकरण निखील याच्या सांगण्यावरून घडल्याने त्यास चौकशीकामी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक संदीप परदेशी करीत आहे.