Private Advt

कुर्‍हेपानाचे सरपंचांसह चौघांची पोलिस कोठडीत रवानगी

भुसावळ : भुसावळ तालुका पोलिसांनी कुर्‍हे पानाचे येथील जुगार अड्ड्यावर छापा टाकत 16 जुगारींसह पाच दुचाकी, सहा मोबाईल व तीन लाख 28 हजार 428 रुपयांचा मुद्देमाल मंगळवारी सायंकाळी जप्त केला होता. सरपंच जीवन प्रल्हाद पाटील, प्रमोद रामा भोई, ईश्वर भागवत भोई व सुभाष भिका पाटील यांनी पोलिसांना मारहाण करून कारवाईला विरोध करीत दोन आरोपींना पळवल्याने त्यांना अटक करण्यात आली होती. संशयीतांना बुधवारी भुसावळ न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

पोलिसांना केली धक्काबुक्की
जुगारावरील कारवाईदरम्यान आरोपींनी बाजारपेठ पोलिस ठाण्याचे कर्मचारी रमण सुरळकर यांच्या मनगट, नाकाला दुखापत करून त्यांच्या ताब्यातील बारी व वराडे यांना सोडवून पळ काढला. या प्रकरणी पोलिस कर्मचारी रमण सुरळकर यांच्या फिर्यादीवरून सरपंचासह चौघांंविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता व पोलिसांनी चौघांना अटक केली होती. संशयीतांना बुधवारी न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

सरपंचाविरुद्ध अपात्रतेचा प्रस्ताव देणार
कुर्‍हे पानाचे येथील सरपंच जीवन पाटील याने पथक जुगार्‍यांवर कारवाई करत असताना पोलिसांना धक्काबुक्की केली. दोन जुगार्‍यांना पोलिसांच्या ताब्यातून पळवून लावले. त्यांना अपात्र करावे यासाठी पोलिस प्रशासनामार्फत जिल्हा प्रशासनाकडे रीतसर प्रस्ताव सादर करणार असल्याचे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे म्हणाले.