Private Advt

पॅरोलवर आल्यानंतर आरोपी ‘जीवा’ बनला वसीम : भुसावळातील जाम मोहल्ला भागातून आवळल्या मुसक्या

भुसावळ : खुनाच्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केल्यानंतर काही महिन्यानंतर संशयीत आरोपी पॅरोल रजेवर परत आला मात्र पॅरोलचा कालावधी उलटूनही तो कारागृहात न परतल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरू करण्यात आला मात्र संशयीताने भुसावळ गाठून आपले नाव बदलून शहरात डेरा जमवला. जुनागड पोलिसांना संशयीताबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी बाजारपेठ पोलिसांकडून मदम मागितल्यानंतर बुधवारी आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या. जीवा कासम पिंजारा (पिप्परवडीया) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

जाम मोहल्ल्यातून आरोपीला अटक
दौलतपुरा जीआयडीसी रोड जुनागड ठाण्याच्या हद्दीत 2004 मध्ये झालेल्या खून प्रकरणात संशयीत जीवा कासम पिंजारा (पिप्परवडिया) यास न्यायालयाने शिक्षा सुनावली होती. जुनागड कारागृहात शिक्षा भोगत असताना त्यास पॅरोल रजा मंजूर झाली व रजा संपल्यानंतरही आरोपी कारागृहात न परतल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल होऊन त्याला फरार घोषित करण्यात आले होते. आरोपी भुसावळातील जाम मोहल्ला भागात वसीम म्हणून वास्तव्यास असल्याची माहित मिळाल्यानंतर जुनागड पोलिस पथकाने भुसावळ गाठले. भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलिस स्टेशनचे हवालदार विजय नेरकर नाईक उमाकांत पाटील, कॉन्स्टेबल प्रशांत परदेशी आदींनी आरोपीच्या जाम मोहल्ला भागातून मुसक्या आवळत त्यास जुनागड पोलिसांच्या ताब्यात दिले.