शासकीय घरबांधणी अग्रीम योजनेतून मिळणार पोलिसांना अग्रीम : राज्य शासनाचा मोठा निर्णय

मुंबई : राज्य पोलिस दलातील अधिकारी, अंमलदार यांना पूर्वीप्रमाणेच शासकीय घरबांधणी अग्रीम योजनेतून अग्रीम देण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. मंत्री मंडळाच्या बैठकप्रसंगी अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या निर्णयामुळे राज्यातील पोलिस दलातील अधिकारी, अंमलदारांना घरबांधणीसाठी अग्रीम मिळणे सुलभ होणार आहे.

इतकी रक्कम अग्रीम स्वरूपात वितरीत
पोलिसांना घरबांधणी अग्रिमाकरिता खाजगी बँकांकडून कर्ज घेण्याची व्यवस्था, महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ यांच्यामार्फत राबविण्याचा निर्णय 10 एप्रिल 2017 रोजी घेण्यात आला होता. त्यानुसार राज्यातील 5 हजार 17 पोलिस अधिकारी, अंमलदार यांना मे-2019 पर्यंत 915 कोटी 41 लाख रुपये घरबांधणी अग्रीमाच्या स्वरूपात वितरीत करण्यात आलेले आहेत.

व्याजाच्या रकमेचा शासनावर आर्थिक भार
सध्या खाजगी बँकामार्फत असलेल्या या कर्ज योजनेमध्ये व्याजाच्या तफावतीची रक्कम जास्त असल्याने त्याचा शासनावर आर्थिक भार पडत आहे. तसेच या बँकांकडून कर्जव्यवस्था होत नसल्यामुळे सदर योजना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र यापूर्वीच कर्ज वाटप करण्यात आलेल्या 5 हजार 17 अर्जांच्या अनुषंगाने किमान त्यांचा कर्ज परतावा पूर्ण होईपर्यंत त्यांच्या कर्जाच्या व्याजावरील फरकाची शासनाकडून देय असणारी रक्कमेची तरतूद करण्यासही बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

या अग्रिमासाठी आतापर्यंत आलेल्या 3 हजार 707 अर्जदारांना तसेच व यापुढील नवीन अर्जदारांसाठी पूर्वीप्रमाणेच म्हणजे शासकीय नियमित घरबांधणी अग्रीम योजना (कइ-) मुख्यलेखाशिर्ष 76103 अंतर्गत घरबांधणी अग्रीम उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.