Private Advt

चाकूच्या धाकावर चाळीसगावातील गॅस एजन्सीतून साडेचार लाख लांबवले

चाळीसगाव : चाकूचा धाक दाखवून चोरट्याने भर दिवसा गॅस एजन्सीतून तब्बल साडेचार लाखांची रोकड लांबवल्याने शहरात खळबळ उडाली. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात एकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

लुटीमुळे शहरात उडाली खळबळ
चाळीसगावातील अशोक किसनचंद छाबडीया (58) हे मालेगाव रोडवरील एच.पी.गॅस एजन्सीत कामाला आहेत. या एजन्सीत दिवसभरात झालेल्या गॅस विक्रीचे पैसे सायंकाळी डिलीव्हरी बॉयकडून घेऊन दुसर्‍या दिवशी बंकेत भरणा करण्याचे काम छाबडीया करतात. सोमवार, 25 एप्रिल रोजी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास छाबडीया हे नेहमीप्रमाणे डिलीव्हरी बॉयकडून पैसे घेऊन मोजत असताना दुकानाचे शटर वर करून भावेश मनोज माखोजा (22, रा.उल्हासनगर) हा चाकू घेऊन मध्ये आला. छाबडीया यांना किरकोळ दुखापत करून पैसे दे अन्यथा जीवे ठार मारण्याची धमकी दिली तसेच तीन लाख 65 हजारांची रोकड व 75 हजार रुपये किंमतीची हिरो होंडा कंपनीची दुचाकी (क्र.एम.एच. 19 डीएक्स 2912) घेवून संशयीताने पळ काढला.

संशयीताविरोधात गुन्हा दाखल
एकूण चार लाख 40 हजारांचा मुद्देमाल लांबवल्याप्रकरणी छाबडीया यांनी
चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात भावेश मनोज माखोजा यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक के.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक विशाल टकले हे करीत आहेत.