Private Advt

सुसाईड नोट लिहित दीपनगरात विवाहितेची आत्महत्या

भुसावळ : केरळातील मूळ रहिवासी व हल्ली दीपनगर वसाहतीत राहणार्‍या 29 वर्षीय तरुण विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केली. शरण्या मनोज पिल्लाई (29, रा.केरळ, ह.मु.दीपनगर वसाहत) असे मयताचे नाव आहे. रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दीपनगर येथील वसाहतीत रहिवासी असलेले आणि औष्णिक वीज निर्मीती केद्रातील मेसमध्ये कामास असलेल्या मनोज पिल्लाई यांच्या त्या पत्नी आहेत.

दाम्पत्यात भांडणाची चर्चा
शरण्या मनोज पिल्लाई या महिलेने तिच्या चार वर्षाच्या मुलास रागावल्यानंतर पतीनेदेखील पत्नी शरण्या यांना रागावल्याने दाम्पत्यात वाद झाल्याची प्राथमिक माहिती आहे तर पतीसह मुलगा एका खोलीत असताना दुसर्‍या रुममध्ये शरण्या यांनी गळफास घेतला. मृत्यूपूर्वी त्यांनी मल्याळी भाषेत सुसाईड नोट लिहिली असून पोलिसांनी ती जप्त केली आहे. पत्नी दरवाजा उघडत नसल्याने पतीने शेजार्‍यांना आवाज दिल्यानंतर दरवाजा तोडल्यानंतर ही घटना समोर आली.

तालुका पोलिसांची धाव
भुसावळ तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश वानखेड, सहायक फौजदार शामकुमार मोरे, प्रेमचंद सपकाळे, अविनाश टहाकळे, सादीक शेख यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, विवाहितेच्या माहेरच्यांना या बाबीची कल्पना देण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगत जप्त चिठ्ठीतील मजकूर मल्याळी भाषेची जाण असणार्‍या व्यक्तीकडून जाणून घेण्यात येईल, असे पोलिस सूत्रांनी दिली.