Private Advt

चिनावल शिवारातील तीन शेतकर्‍यांच्या शेतात पुन्हा केळी घड कापले : दोन लाखांचे नुकसान

सावदा : चिनावल परीसरात काही दिवसांच्या अंतरानंतर माथेफिरूंनी डोके वर काढत तीन शेतकर्‍यांच्या शेतातील केळी घड कापल्याने सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले आहे. रविवार, 10 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजेपासून ते 11 एप्रिलच्या सकाळी सात वाजेदरम्यान चिनावल शेत शिवारातील खिरोदा रोडवरील तीन शेतकर्‍यांच्या शेतातील सुमारे 400 केळी खोड घडासहित कापून नुकसान करण्यात आल्याने सुमारे दोन लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

नुकसानीमुळे शेतकरी संतप्त
शेतकरी रामदास निंबा पाटील यांच्या गट क्रमांक 643 मधील शेतातून 200 केळी खोड व घड, कैलास डोंगर भंगाळे यांच्या गट क्रमांक 159/2 मधील 150 केळी घड तसेच मयूर अनिल पाटील यांच्या गट क्रमांक 645 मधील 50 घड कापून नुकसान केले. पोलिस उपनिरीक्षक समाधान गायकवाड यांनी पाहणी केली. या प्रसंगी शेतकर्‍यांनी पोलिसात तक्रार नोंदवली आहे.

सावदा पोलिसात शेतकर्‍यांची फिर्याद
केळी घड नुकसानीप्रकरणी रामदास निंबा पाटील, कैलास डोंगर भंगाळे, मयूर अनिल पाटील यांनी स्वतंत्र फिर्याद दाखल करून संशयीताचे नाव पोलिसांना दिले आहे. यावेळी सावदा पोलिस स्टेशन मध्ये नुकसानग्रस्त शेतकर्‍यांसोबत श्रीकांत सरोदे, चंद्रकांत भंगाळे, गोपाळ नेमाडे, ठकसेन पाटील, संदीप महाजन, पोलिस पाटील निलेश नेमाडे, तंटामुक्ती अध्यक्ष योगेश बोरोले, हितेश भंगाळे, भूपेंद्र सरोदे, उपसरपंच परेश महाजन व चिनावल येथील अनेक शेतकरी उपस्थित होते.