Private Advt

बेसमेंट दाखवून व्यावसायिक वापर ; 28 दुकानांवर कारवाई

सोमवारपासून कारवाई होण्याची शक्यता

जळगाव। बांधकाम परवानगी घेताना पार्किंगची जागा दाखवली. परंतु, प्रत्यक्षात वापर करताना मात्र, व्यावसायिक वापर सुरू असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे नेहरू चौक ते टॉवर चौक दरम्यानच्या 28 व्यावसायिक प्रतिष्ठानांना सकारण आदेश बजावले जात आहेत. सर्वेक्षणादरम्यान वापर चुकीचा असल्याने सर्व दुकानांना सील ठोकले जाणार असून सोमवारनंतर प्रत्यक्ष कारवाई सुरू होईल.

महापालिका क्षेत्रात पार्किंगची समस्या डोके वर काढत आहे. प्रमुख वर्दळीच्या एकाही रस्त्यावर पार्किंगची व्यवस्था नाही. जी व्यापारी संकुले व दुकानांसमोर वाहने उभी दिसतात त्या दुकानांच्या बेसमेंटमधील पार्किंग केवळ कागदावर आहेत. प्रत्यक्षात व्यावसायिक वापर करून पैसे कमावले जाताहेत. त्याचा परिणाम रस्त्यावर वाहनांची संख्या वाढत असून वाहतुकीचा खोळंबा होतो आहे. या संदर्भात दोन महिन्यांपूर्वी सर्वेक्षण केले होते. त्यात 30 पैकी 28 ठिकाणी पार्किंगची जागा आर्थिक कमाईसाठी गिळंकृत केल्याचे उघड झाले आहे. या सर्व प्रतिष्ठानांची सुनावणी होऊन त्यांच्यावर कारवाईसाठी सकारण आदेश बजावले जाताहेत. गोदामाऐवजी दुकाने उघडली, तसेच पार्किंग ऐवजी दुकाने अथवा गोदामासाठी वापर सुरू असलेल्या प्रतिष्ठनांना सील करण्यात येणार असल्याचे समजते.

या दुकानांवर होणार कारवाई
महापालिका प्रशासनाला सकारण आदेश काढण्यात येणार्‍या व्यापारी संकुल आणि व्यावसायिकांची यादी प्राप्त झाली आहे. लिलम ड्रायफूट, प्रितम शूज, लुईस फिलिफ, रायसोनी किड्स, कार्पोरेशन बँक, ब्लॅक बेरी शोरूम, पिटर इंग्लंड, आहुजा डिजिटल फोटो लॅब, नटवर थिएटर मॉल, नटवर मल्टिप्लेक्स, सेलिब्रेशन मॉल, दीपक शूज, प्राप्ती गारमेंट्स, श्रीराम प्लाझा, शहा ऑर्किड, पंजाबी मन्नत शूज, नीलेश फुटवेअर, खान्देश स्पोर्ट्स, बाटा शो रूम, नॅशनल स्टोअर आणि शीतल कलेक्शन यांना नोटीस बजावून कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान शहरातील व्यापारी संकुलात बेसमेंटच्या जागेवर अनधिकृतपणे व्यावसायिक वापर होत असून याकडे महानगरपालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात होते. मात्र प्रशासनाने या दुकानांवर कारवाई करण्यासाठी नोटीस बजाविली असून  सोमवारी प्रशासनाकडून कारवाई करण्यात येणार आहे.