Private Advt

फोन टॅपिंग प्रकरण राजकीय स्पर्धकाच्या सांगण्यावरून घडले : माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे

भुसावळ (गणेश वाघ) : बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणी ज्येष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांना मुंबई पोलिसांनी गुरुवारी हजर राहण्यास सांगितल्यानंतर गुरुवारी खडसे यांनी कुलाबा पोलिसात जवाब नोंदवला. या संदर्भात ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना माजी मंत्री खडसे म्हणाले की, 40 वर्ष ज्या पक्षात काम केले व ज्या भाजपा पक्षाला निष्ठेने वर आणले त्या पक्षाचे सरकार असताना माझा फोन टॅप होण्याचा प्रकार म्हणजे हा घाणेरड्या राजकारणाचा अनुभव आहे. या प्रकाराची आता सखोल चौकशी गरजेची असून कुणाच्या सांगण्यावरून हा प्रकार घडला हेदेखील समोर येणे गरजेचे आहे. राजकीय स्पर्धकाच्या सांगण्यावरून हा दुर्दैवी प्रकार घडल्याचा आपल्याला संशय असल्याचे ते म्हणाले.

खडसे म्हणाले : यापूर्वीच आली होती शंका
रश्मी शुक्ला या कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्या नाहीत त्या आयपीएस अधिकारी आहेत त्यामुळे त्यांनी कुणाच्या सूचना व अधिकारावरून फोन टॅप केले हे स्पष्ट होणे गरजेचे आहे. माझ्या खाजगी आयुष्यात ढवळा-ढवळ करण्यात आली असून समाजविघातक कृत्य करणार्‍यांच्या यादीत आपले नाव टाकण्यात आले. यापूर्वी सुद्धा माझा फोन टॅप होता, असा पत्रव्यवहार मी राज्याचे चीफ व होम सेक्रेटरी यांना 2019 पूर्वीच पत्र देवून कळवले होता व तो संशय आता खरा ठरला आहे. माझ्या व्यक्तीगत झालेल्या बदनामीनंतर कायदेशीर सल्ला घेवून कायदेशीर कारवाई करणार असल्याचे खडसे म्हणाले.

राजकीय स्पर्धकाच्या सांगण्यावरूनच फोन टॅपींग
कुणीतरी माझा राजकीय स्पर्धक असावा व ज्याला मी राजकीय स्पर्धक वाटतो त्यांच्या सूचनेनुसार फोन टॅपींग प्रकरण घडल्याचा संशय असल्याचे कुणाचेही नाव न घेता माजी मंत्री खडसे यांनी व्यक्त केला. पोलिसांना याचा तपास करावा, अशी विनंती आपण केली आहे, असेही खडसे म्हणाले.