Private Advt

चोरलेली क्रुझर सोडून चोरट्यांचे पलायन : मध्यप्रदेशातून शिरपूर पोलिसांनी वाहन घेतले ताब्यात

शिरपूर : मुंबई-आग्रा महामार्गावरील तालुक्यातील सांगवी येथून 4 दिवसांपूर्वी चोरीस गेलेली क्रूझर गाडी तालुका पोलिसांनी शनिवारी मध्यप्रदेश राज्यातुन ताब्यात घेतली. शिरपूर तालुक्यातील सांगवी गावातून 30 मार्च 2022 रोजी एम एच 17 एजे 1900 क्रमांकाची क्रुझर गाडी चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली होती.याप्रकरणी साहेबराव देवराम पवार यांनी घरासमोर उभी केलेली 3 लाख रुपये किमतीची सदर क्रमांकाची क्रूझर गाडी अज्ञातांनी 29 मार्च ते 30 मार्च 2022 च्या रात्रीस चोरून नेल्याची तक्रार 1 मार्च रोजी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.दाखल तक्रारीवरून तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांनी तपासाचे चक्रे वेगात फिरवीत पथके तयार करून मध्यप्रदेश राज्यात रवाना केले.

बेवारस क्रुझर केली जप्त
पथकाने मध्यप्रदेश राज्यातील सेंधवा कुकक्षी टोलनाकाचे सीसीटीव्ही कॅमेरे चेक करुन तसेच तांडा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांची मदत घेवून तांडा पोलीस ठाण्याचा परिसरात कसुन शोध घेतला असता सदर गुन्हयातील चोरीस गेलेली क्रुझर गाडी क्र. एमएच-17-एजी-1900 ही तांडा ते बाग रोडवर झाडाखाली लावलेली आढळून आली.सदर गाडी ताब्यात घेत तालुका पोलीस ठाण्यात आणण्यात आली. क्रूझर गाडीचे मूळ मालक साहेबराव देवराम पवार यांच्या ताब्यात देण्याची कारवाई सुरू आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर 24 तासाच्या आत तालुका पोलिसांनी चोरीस गेलेली क्रूझर गाडी शोधून काढल्याने तालुका पोलिसांचे कौतुक करण्यात येत आहे.

यांची यशस्वी कामगिरी
ही कामगिरी शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेंद्र मांडगे, संजय धनगर, संतोष पाटील, योगेश मोरे यांनी केली.