Private Advt

जळगाव खून प्रकरण ; आरोपी तासाभरात गुन्हे शाखेच्या जाळ्यात

जळगाव : अनैतिक संबंधातून जळगावात अवघ्या आठ दिवसांपूर्वी दोन युवकांच्या हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच सोमवार, 4 एप्रिल रोजी सायंकाळी पुन्हा शहरातील शिवाजीनगर हुडको परीसरात 40 वर्षीय मोहंमद मुसेफ शेख इसाक (40, रा.शिवाजी नगर) यांचा चॉपरचे वार करून खून करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेने तासाभरात आरोपी शेख अलिमोद्दीन शेख (28, रा.उस्मानिया पार्क) याच्या मुसक्या आवळल्या आहेत. खुनाचे मात्र अद्याप स्पष्ट कारण समोर आलेले नाही.

चॉपरचे वार करीत हत्या
शेख हे काहीच काम करीत नसल्याने घरीच होते व त्यांनी सोमवारी अझरोद्दीन याला शिवीगाळ केली होती तसेच दोघांमध्ये जुने वादही होते. यातूनच सोमवारी अझरोद्दीनने चॉपरने वार करून शेख यांचा खून केल्याचे समजते. खुनाची घटना घडताच घटनास्थळी अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलिस उपअधीक्षक कुमार चिंथा, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक विजय ठाकूरवाड यांच्यासह अधिकारी व कर्मचार्‍यांनी धाव घेतली. शेख यांच्या मृतदेहाजवळ चॉपरचे कव्हर, एका शस्त्राची मूठ, रुमाल असे साहित्य मिळून आले. घटनेच्या तासाभरानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अझरोद्दीन याला ताब्यात घेतले. रात्री 10 वाजता शेख यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले.

नऊ दिवसात तिसरी खुनाची घटना
जळगावात 24 तासांच्या अंतरात दोन तरुणांच्या अनैतिक संबंधाच्या कारणावरून 26 मार्च रोजी खून झाला होता. पहिल्या घटनेत समता नगर भागातील रहिवासी सागर नरेंद्र पवार (28) या तरुणाचा विवाहितेशी असलेल्या अनैतिक संबंधातून संशयीत आरोपी अमित नारायण खरे (डॉ.आंबेडकर नगर, समता नगर, जळगाव) याने शुक्रवारी रात्री खून केला तर दुसर्‍या घटनेत जळगावच्या शिवाजी नगर भागातील पतीपासून विभक्त राहत असलेल्या महिलेशी असलेल्या दोघांच्या असलेल्या अनैतिक संबंधातून रीक्षा चालक असलेल्या नरेश आनंदा सोनवणे (28, रा.राजाराम नगर, दुध फेडरेशन) या तरुणाची चॉपरचे वार करून हत्या करण्यात आली. जळगावातील शिवाजी नगर, हुडको भागात शनिवार, 26 रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती. या प्रकरणी आकाश सखाराम सोनवणे (24, कानळदा रोड, जळगाव) या आरोपीच्या जळगाव गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली होती. दरम्यान, शहरात दिवसागणिक गुन्हेगारी वाढत असून क्षुल्लक कारणावरून खुनाच्या घटना घडत असल्याने नागरीकांमध्ये घबराट पसरली आहे.