ब्रेकींग न्यूज : नाशिकजवळ डाऊन पवन एक्स्प्रेसचे 11 डबे रूळावरून घसरले : वाहतूक ठप्प

भुसावळ (गणेश वाघ) : मुंबईहून जयनगरसाठी निघालेल्या डाऊन 11061 डाऊन एलटीटी-जयनगर एक्स्प्रेसचे 11 डबे रेल्वे रूळावरून घसरल्याची नाशिकजवळ घडली. रविवार, 3 एप्रिल रोजी दुपारी तीन वाजून 10 मिनिटांच्या सुमारास हा अपघात घडल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेत सुमारे 15 प्रवासी जखमी झाले असून त्यात तीन तिकीट निरीक्षकांचा समावेश असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. रेल्वे प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान, गेल्या काही वर्षातील हा सर्वात मोठा रेल्वे अपघात असून या अपघातामुळे डाऊन लाईनवरील ईगतपुरी-मनमाड दरम्यान रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. अनेक गाड्या ईगतपुरी, कसारा आदी रेल्वे स्थानकांवर थांबवून ठेवण्यात आल्या आहेत.

रेल्वे रूळाला तडे गेल्याने अपघाताचा अंदाज
मुंबईहून जयनगरकडे निघालेली डाऊन 11061 पवन एक्स्प्रेसचे चार डबे लहावीट-देवळाली दरम्यान रविवारी दुपारी 3.10 वाजेच्या सुमारास घसरले. या अपघाताचे ठोस कारण स्पष्ट झाले नसलेतरी रेल्वे रूळाला तडे गेल्याने हा अपघात घडल्याचा अंदाज आहे.

रेल्वे अपघातात 15 प्रवासी जखमी
डाऊन पवन एक्स्प्रेसच्या अपघातातील सुमारे 15 रेल्वे प्रवासी जखमी झाले असून त्यात रेल्वेतील तीन तिकीट निरीक्षकांचा समावेश आहे. जखमींना तातडीने उपचारार्थ हलवण्यात आले आहे. रेल्वे अपघातामुळे डाऊन मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून अप मार्गावरील रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

भुसावळातून अधिकारी रवाना
नाशिकजवळ घडलेल्या या अपघातानंतर भुसावळातील वरीष्ठ अधिकार्‍यांसह कर्मचारी तसेच एआरटी टीम घटनास्थळी रवाना झाली आहे. डाऊन लाईनवरील ईगतपुरी ते मनमाडदरम्यान रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे तर ईगतपुरी व कसारा रेल्वे स्थानकावर डाऊन मार्गावरील रेल्वे गाड्या थांबवून ठेवण्यात आल्या आहेत. रात्री उशिरापर्यंत वाहतूक सुरळीत होण्याची आशा असून तो पर्यंत मात्र प्रवाशांना असुविधांचा सामना करावा लागणार आहे. दरम्यान, या गाडीवर लोकोपायलट एस.आर.शर्मा व असि.पायलट कमलेश मीना असल्याची माहिती सूत्रांनी दिली.