Private Advt

भुसावळात बारागाड्या अनियंत्रीत झाल्याने चौघे भाविक जखमी : पोलिसांचा तोकडा बंदोबस्त

भुसावळ : भुसावळात मरीमाता यात्रोत्सवानिमित्त ओढण्यात आलेल्या बारागाड्या ओढताना अनियंत्रीत होवून भाविकाचा मृत्यू झाल्याची तर अन्य चौघे भाविक जखमी झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली होती. नववर्षाच्या प्रारंभालाच घडलेल्या या दुर्दैवी घटनेने पाच वर्षांच्या जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला आहे. सन 2018 मध्ये भुसावळ शहर पोलिस दलातील कर्मचारी रमेश सौंदाणे-कुंभार यांचा बारागाड्या आल्याने मृत्यू झाला होता. पंचमुखी हनुमान मंदिराजवळ बंदोबस्तावर असताना ही दुर्घना घडली होती. दरम्यान, पोलिस प्रशासनाने तोकडा बंदोबस्त पुरवल्याने सुज्ञ नागरीकातून संताप व्यक्त होत आहे. पोलिस प्रशासनाने काटेकोरपणे बंदोबस्ताचे नियोजन न केल्याने शहरवासीयांमधून संताप व्यक्त होत आहे.

पहेलवानाच्या सतर्कतेने अनर्थ टळला
सूत्रांच्या माहितीनुसार, बारागाड्यांपैकी पहिल्याच गाडीच्या दुस्सरवर पहिलवान आकाश संजय पाटील हा जुने सतारेतील तरुण बसला होता. त्याने प्रसंगावधान राखून गाड्या नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अन्यथा वेगवान गाड्या दुभाजक ओलांडून पलिकडे सरदार वल्लभभाई पुतळ्याजवळ उभ्या भाविकांच्या अंगावर धडकून मोठी जीवितहानी झाली असती !

एका भाविकाचा मृत्यू : चौघे गंभीर
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे जुना सातारा भागातील मरीमातेची यात्रा व बारागाड्या उत्सव झाला नव्हता. यंदा हा उत्सव साजरा होणार असल्याने शनिवारी सायंकाळी जळगाव रोडवर गुरुद्वारापासून ते जुने सतारेपर्यंत भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. नियोजनानुसार पूजाविधी होऊन सायंकाळी 7 वाजता जळगाव रोडवरील गुरुद्वारा पासून बारागाड्या ओढण्यास सुरूवात झाली. यानंतर अवघ्या तीन मिनिटांत गाड्या जुने सतारे चौकात पोहोचल्या. यावेळी बारागाड्या अनियंत्रीत झाल्याने भाविक गिरीश रमेश कोल्हे (42, रा.सुतार गल्ली, जळगाव रोड, भुसावळ) यांच्या पोट व डोक्यावरुन चाक केल्याने त्यांचा मृत्यू झाला तर बारागाड्या लोटणारे भाविक छोटू उत्तम इंगळे (33, रा.कोळीवाडा, भुसावळ), धर्मराज देवराम कोळी (63, रा.जुने सतारे, मरीमाता मंदिराजवळ, भुसावळ), मुकेश यशवंत पाटील (28, रा.खळवाडी, भुसावळ), शिक्षक नितीन सदाशिव फेगडे (53, रा.गणेश कॉलनी, भुसावळ) हे भाविक गाडीखाली आल्याने जखमी झाले. या दुर्घटनेनंतर यात्रोत्सवाच्या उत्साहावर विरजण पडले. दरम्यान, दुर्घटनेत मृत गिरीश कोल्हे हे अविवाहित असून त्यांचा पीठ गिरणीचा व्यवसाय होता. गेल्या वर्षी त्यांच्या भावाने कोरोनामुळे निधन झाले. पश्चात आई-वडील आहेत.

पोलिसांचा बंदोबस्त फेल
जळगाव रोडवर बारागाड्या ओढल्या जाताना रस्ता दुभाजकाच्या एकाच बाजूने अधिक गर्दी होते. या गर्दीवर नियंत्रणासाठी तोकडा बंदोबस्त ठेवण्यात आल्याने गर्दी बाजूला करताना स्थानिक माजी नगरसेवकांसह काही युवा कार्यकर्तेच मेहनत घेताना दिसून आले मात्र गर्दी बाजूला सारण्यासाठी देखील पोलिसांची मदत झाली नाही. कदाचित गर्दीवर नियंत्रण असते तर ही दुर्घटना टाळता आली असती, अशीही चर्चा ऐकायला मिळाली.