Private Advt

भुसावळात इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेने काढला बैलगाडी मोर्चा

बैलगाडीवर सिलिंडरसह तेलाचा कॅन ठेवून प्रशासनाचे वेधले लक्ष : दरवाढ कमी न झाल्यास आंदोलन

भुसावळ : केंद्र सरकारकडून दिवसागणिक पेट्रोलसह डिझेलच्या दरात वाढ होत आहे शिवाय घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरसह खाद्य तेलाचे दरही गगनाला भिडल्याने सर्वसामान्य नागरीकांचे जगणे कठीण झाले आहे. वाढत्या महागाईला जनता वैतागली असून महागाई नियंत्रणात आणावी या मागणीसाठी भुसावळातील स्थानिक शिवसेना पदाधिकार्‍यांनी मंगळवारी प्रांताधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढत प्रशासनाचे लक्ष वेधले. महागाईचा निषेध दर्शवण्यासाठी बैलगाडीवर तेलाचा कॅन व सिलिंडरही ठेवण्यात आले. यावेळी केंद्र शासनाच्या कारभाराविरोधात पदाधिकार्‍यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

बैलगाडी मोर्चाने वेधले लक्ष
पालकमंत्री गुलाबराव पाटील, शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळातील स्थानिक पदाधिकार्‍यांनी मंगळवारी सकाळी प्रांताधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढला. महागाईचा निषेध दर्शवण्यासाठी बैलगाडीवर गॅस सिलिंडर व तेलाचा कॅनही ठेवण्यात आला. प्रभाकर हॉल ते प्रांताधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत बैलगाडी नेण्यात आली. यावेळी पदाधिकार्‍यांनी वाढती महागाई नियंत्रणात आणण्याची मागणी करीत केंद्र सरकारच्या कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

महागाई नियंत्रणात आणा अन्यथा आंदोलन
निवेदनाचा आशय असा की, गेल्या काही दिवसांपासून महागाई गगनाला भिडल्याने सर्वसामान्यांना जगणे कठीण झाले आहे. इंधनाच्या वाढत्या दरांसोबत घरगुती वापरावयाच्या गॅस सिलिंडरसह खाद्य तेलाचे दर गगनाला भिडल्याने सर्वसामान्यांना मोठा फटका सोसावा लागत आहे. केंद्र सरकारने महागाई तत्काळ नियंत्रणात आणावी अन्यथा शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पदाधिकार्‍यांनी प्रसंगी दिला.

यांचा आंदोलनात सहभाग
आंदोलनात शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान धर्मा महाजन, जिल्हा संघटक विलास मुळे, उपजिल्हाप्रमुख प्रा.उत्तमराव सुरवाडे, संतोष सोनवणे, अ‍ॅड.कैलास लोखंडे, उपशहरप्रमुख गुणवंत पाटील, उप जिल्हा युवा अधिकारी प्रवीण पाटील, शहर प्रमुख बबलू बर्‍हाटे व निलेश महाजन, कट्टर शिवसैनिक उमाकांत (नमा) शर्मा यांच्यासह शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित हेाते.