Private Advt

मनपा प्रशासनाने केले अक्खे भोईटे मार्केट सील

जळगाव – मनपा प्रशासनाकडून गुरुवारी अक्खे भोईटे मार्केट सील करण्यात आले यावेळी तब्बल २४ गाळे सील करण्यात आले. मनपाकडून थकीत भाडे असलेल्या गाळेधारकांवर करण्यात आलेली हि सर्वात मोठी कारवाई आहे. कारवाईवेळी गाळेधारकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मनपा अधिकाऱ्यांनी हा विरोध झुगारूत सर्व गाळे सील केले.

मनपा उपायुक्त प्रशांत पाटील व शाम गोसावी यांच्या नेतृत्वाखाली मनपा अतिक्रमण निर्मुलन विभागाच्या पथकातील संजय ठाकूर, किशोर सोनवणे, किरकोळ वसुली विभागाचे नरेंद्र चौधरी यांच्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली. भोईटे मार्केटमधील  महापालिकेच्या मालकीच्या मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांना मनपाकडून अनेकवेळा आवाहन करूनही थकीत भाड्याची रक्कम न भरल्याने हि कारवाई करण्यात आली.

 

प्रस्ताव न आल्याने कारवाई
१२ मे २०२१ रोजी झालेल्या महासभेत गाळे प्रकरणी मनपाचे धोरण निश्चित झाल्यानंतर गाळेधारकांना मनपा अधिनियमानुसार नुतनीकरणासाठी प्रस्ताव दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मनपा प्रशासनाने भोईटे मार्केटमधील गाळेधारकांना ३१ जानेवारीपर्यंत थकीत भाड्याची रक्कम भरण्यासह नुतनीकरणासाठीचे प्रस्ताव सादर करण्याचा सूचना मनपा प्रशासनाने दिल्या होत्या. मात्र, या मुदतीत या मार्केटमधील एकाही गाळेधारकाने थकीत भाड्याची रक्कम व नुतनीकरणासाठीचे प्रस्ताव देखील सादर केले नाहीत. त्यामुळे मनपाकडेही पर्याय नसल्याने, मनपाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

गाळ्यांचा होणार लिलाव
महापालिका अधिनियमानुसार जे गाळेधारक नुतनीकरणाचे निकष पुर्ण करतील असेच गाळेधारक नुतनीकरणासाठी पात्र ठरणार आहेत. नुतनीकरणासाठी प्रस्ताव न आल्यास हे गाळेधारक नुतनीकरणासाठी पात्र नाहीत, असे समजून गाळे जप्त केल्यानंतर या गाळ्यांचा जाहीर लिलाव करण्याचा एकमेव पर्याय मनपाकडे असून, आता भोईटे मार्केटमधील २४ गाळ्यांचा जाहीर लिलाव करण्यात येणार आहे. अशी माहिती मनपातर्फे देण्यात अली.