Private Advt

जनसंवाद आणि पत्रकारिता विभागातर्फे ‘नेट, सेट आणि पेट मार्गदर्शन’ कार्यशाळा

जळगाव –  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील जनसंवाद आणि पत्रकारिता विभागातर्फे आज पासून ‘जनंसवाद आणि पत्रकारिता : नेट, सेट आणि पेट मार्गदर्शन’ या विषयावर राज्यस्तरीय ऑनलाईन कार्यशाळेस प्रारंभ होणार असून दि.९ ते ११ फेब्रुवारी २०२२ दरम्यान ही कार्यशाळा होणार आहे. या कार्यशाळेत महाराष्ट्रातील तज्ज्ञ मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. 

कार्यशाळेचे उद्घाटन आज दि. ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता विद्यापीठाचे प्र-कुलगुरु प्रा. डॉ. बी. व्ही. पवार यांच्या हस्ते होणार आहे. ही कार्यशाळा ऑनलाईन असून झुमअॅप व युट्यूबद्वारे दररोज सकाळी ११ ते दुपारी ४ यावेळेत आयोजित करण्यात आली आहे. कार्यशाळेचे मुख्यसंयोजक विभागप्रमुख प्रा. डॉ. सुधीर भटकर असून उद्घाटन व समारोप सत्राचे अध्यक्ष कला व मानव्यविद्या प्रशाळेचे संचालक प्रा. डॉ. अनिल चिकाटे राहतील. कार्यशाळेत उद्घाटन व समारोप सत्रासोबतच दहा मार्गदर्शनपर सत्र आयोजित करण्यात आले आहेत.

कार्यशाळेत महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील जनसंवाद आणि पत्रकारिता विषयाचे शिक्षक दररोज चार सत्रात विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. यात पहिल्या दिवशी (दि.९फेब्रुवारी) `जनसंवाद आणि पत्रकारिता ओळख` या विषयावर प्रा. डॉ. संजय रानडे (मुंबई विद्यापीठ), `विकास आणि सामाजिक बदलासाठी संवाद` या विषयावर प्रा. डॉ. संजय तांबट (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ), `वृत्तसंकलन आणि संपादन` विषयावर प्रा. डॉ. शिवाजी जाधव (शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर), `जाहिरात आणि विपणन संवाद` विषयावर प्रा. डॉ. मंजूला श्रीनिवास, (एच. एस. एन. सी.,विद्यापीठ, मुंबई) हे मार्गदर्शन करणार आहेत.

दुस-या दिवशी (दि. १० फेब्रुवारी) `जनसंपर्क आणि कार्पोरेट कम्युनिकेशन` या विषयावर प्रा. डॉ. रवींद्र चिंचोलकर (पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठ, सोलापूर), `माध्यम कायदा आणि नितिमत्ता` या विषयावर प्रा. डॉ. शाहेद शेख (औरंगाबाद), `माध्यम आणि व्यवस्थापन आणि निर्मिती` या विषयावर प्रा. डॉ. मीरा देसाई (एस.एन. डी. टी. विद्यापीठ, मुंबई), `माहिती आणि संवाद तंत्रज्ञान आणि माध्यमे` या विषयावर डॉ. सोमनाथ वडनेरे (कबचौउमवि, जळगाव), हे मार्गदर्शन करतील.

तिस-या दिवशी (दि. ११ फेब्रुवारी)  `संवाद संशोधन` या विषयावर प्रा. डॉ. उज्वला बर्वे (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) तर `चित्रपट आणि दृश्य संवाद` या विषयावर प्रा. राहूल चौधरी (तुलजाराम महाविद्यालय, बारामती) हे मार्गदर्शन करतील. कार्यशाळेचा समारोप दि. ११ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. आर. एल. शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

 कार्यशाळा सेट व नेट परीक्षेच्या पेपर क्र. २ व ३ वर आधारीत असून पीएच. डी. पूर्वप्रवेश (पेट) परीक्षेसाठी देखील उपयुक्त आहे. कार्यशाळेसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश नि:शुल्क असून अधिक माहितीसाठी इच्छुकांनी जनसंवाद आणि पत्रकारिता विभागात मोबाईल क्रमांक 9423490044 किंवा 9860046706 वर संपर्क साधावा असे आवाहन कार्यशाळेचे संयोजक विभागप्रमुख प्रा.डॉ. सुधीर भटकर, सहसंयोजक डॉ. विनोद निताळे, डॉ. गोपी सोरडे, डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी केले आहे.