Private Advt

घृणास्पद ! कोरोनाने मृत झालेल्या पत्नीची रक्कम चोरांनी पळविली

प्रकाशात तो वृद्ध ढसाढसा रडला

 

नंदुरबार। कोरोना या महामारीने मृत्यू झालेल्या पत्नीचे शासनाकडून मिळालेले अर्थसहाय्य बँक खात्यावर जमा झाले होते. जमा झालेली पन्नास हजार रुपयांची रक्कम काढण्यासाठी मयत महिलेचा वृद्ध पती प्रकाशा येथील बँकेत गेला. त्या बँकेतून वृद्धाने 50 हजार रुपये काढले. त्यानंतर नातवांसाठी एका हॉटेलवर खाऊ घेत असतानाच 50 हजार रुपयांची ‘ती’ पिशवी चोरट्यांनी पळवून नेली. ही घटना बुधवारी, 2 फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास घडली. कोरोनाने मृत्यू झालेल्या पत्नीचे अर्थसाह्य शासनाने दिले होते. मात्र, चोरट्यांनी ते पळविल्याने तो वृद्ध ढसाढसा रडत बसला. त्यामुळे त्यांच्यावर ‘शासनाने दिले मात्र चोरांनी ते पळविले’ तसेच ‘देव देते अन् कर्म नेते’ अशी दुहेरी उक्ती म्हणण्याची वेळ आली.

सविस्तर असे, शहादा तालुक्यातील डामरखेडा येथील पदम हारचंद कोळी यांच्या पत्नीचे कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत मृत्यू झाला होता. शासनाने कोविडमध्ये मृत्यू झालेल्यांच्या वारसांना 50 हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार डामरखेडा येथील पदम कोळी वृद्धाच्या बँक खात्यात 50 हजार रुपयांची रक्कम जमाही झाली होती. ती रक्कम काढण्यासाठी तो वृद्ध 2 फेब्रुवारी रोजी जवळच्या प्रकाशा येथील बँकेत गेला होता. त्या वृद्धाने उदरनिर्वाह करण्यासाठी बँकेतून 50 हजार रुपयांची रक्कम काढली. बसस्थानकावर आल्यावर त्याठिकाणी नातवांसाठी एका हॉटेलात खाऊ घेत असतानाच त्यांच्या हातातील पैशांची पिशवी चोरट्यांनी पळवून नेली. घटनास्थळी त्या वृद्धाने आरडाओरड केली. परंतु चोर तेथून पळ काढण्यात यशस्वी झाले. या घटनेने तो वृद्ध कमालीचा हताश होऊन ढसाढसा रडत बसला.

चोरांचा कसून शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान
घटनेची आपबिती कथन करण्यासाठी त्या वृद्धाने प्रकाशा येथील पोलीस ठाणे गाठले. तेथे हकीगत सांगितली. पोलिसांनी त्या वृद्धाची फिर्याद नोंदवून घेतली आहे. प्रकाशा हे गाव दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. त्यामुळे याठिकाणी विविध राज्यातून भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे बस स्थानक परिसरात नेहमी वर्दळ असते. त्याचा फायदा घेत चोरट्यांनी चोरी करण्याचा सपाटा सुरूच ठेवला आहे. प्रकाशात चोरांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. त्याचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस यंत्रणा अपयशी ठरत असल्याचा आरोप नागरिक करू लागले आहेत. हा कलंक पुसून टाकण्यासाठी प्रकाशा पोलिसांनी त्या चोरांचा कसून शोध घेण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. तसेच वृद्धाची पळविलेली पन्नास हजाराची रक्कम परत मिळवून देण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.