Private Advt

टीईटी परीक्षेत पैसे घेऊन 7 हजार 800 जणांना पास केल्याचे उघड

 

नंदुरबार –
टीईटी परीक्षेत तब्बल सात हजार आठशे उमेदवारांकडून पैसे घेत पास करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा खळबळ उडाली असून नंदुरबार जिल्ह्यात त्यात किती बोगस ठरतात याची उकल लवकरच होणार असल्याने त्यांच्याकडून पैसे घेणाऱ्या दलालांचे सात गेले आणि पाचच राहिल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
पुणे सायबर पोलिसांच्या तपासामध्ये ही बाब समोर आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान 2018 आणि 2019 च्या परीक्षेत मोठ्या प्रमाणात हा गैरव्यवहार झाला आहे. राज्य परीक्षा परिषदेकडून आलेला मूळ निकाल आणि प्रत्यक्ष जाहीर केलेला निकाल याची पडताळणी सायबर पोलिसांकडून करण्यात आली आहे. त्या परीक्षेत घोटाळेबाज यांनी उमेदवाराकडून पैसे घेत त्यांना पात्र ठरवण्याचे उघडकीस आले आहे. दरम्यान 2019 20 च्या परीक्षेत एकूण 16 हजार 592 जण पात्र असल्याचा निकाल लावण्यात आलेला होता. मात्र पोलिसांनी प्रत्यक्ष निकाल पडताळून पाहिल्या नंतर तब्बल सात हजार आठशे परीक्षार्थी अपात्र असल्याचं समोर आले आहे. असे असतानाही या सर्वांना पात्र ठरविण्यात आल्याची बाब पुणे सायबर पोलिसांच्या तपासानंतर लक्षात येताच शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
टीईटी घोटाळ्याचे मुख्य केंद्र नंदुरबार जिल्हा असल्याचे सांगितले जाते, त्यामुळे या जिल्ह्यातील किती उमेदवार अपात्र असतांना पात्र ठरविण्यात आले आहे, याची उकल लवकरच होणार आहे. त्यामुळे या घोटाळ्यातील दलाल आणि त्यांना पैसे देऊन बोगस गुरुजी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांना चांगलीच धडकी भरली गेली आहे.