जामनेर पंचायत समितीतील लाचखोर कनिष्ठ लिपिक जळगाव एसीबीच्या जाळ्यात

भुसावळ : गाईचा गोठा शेडचे बांधणीचे प्रकरण मंजूर झाल्यानंतर शेड काम सुरू करण्यासाठी लागणारी वर्क ऑर्डर मिळवून देण्याच्या मोबदल्यात तीन हजारांची लाच मागून ती कार्यालयातच स्वीकारताना जामनेर पंचायत समितीतील कनिष्ठ लिपिकाला जळगाव एसीबीच्या पथकाने गुरुवारी सकाळी अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. वसंत पंडीत बारी (53, रा.शेंदुर्णी, ता.जामनेर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

जामनेर पंचायत समितीत स्वीकारली लाच
जामनेर तालुक्यातील शेवगे पिंप्री येथील 54 वर्षीय तक्रारदारांचे गाईचा गोठा शेडचे बांधणीचे प्रकरण मंजूर झाले मात्र शेड काम सुरू करण्यासाठी लागणारी वर्क ऑर्डर मिळवून देण्याच्या मोबदल्यात आरोपी वसंत बारी यांनी 11 जानेवारी तीन हजारांची लाच मागितली होती. तक्रारदाराला तक्रार द्यावयाची नसल्याने त्यांनी एसीबीकडे तक्रार नोंदल्यानंतर लाच पडताळणी करण्यात आली व सापळा रचण्यात आला. गुरुवार, 13 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास आरोपी पंचायत समिती कार्यालयातील आपल्या कक्षात लाच स्वीकारताच त्यास अटक करण्यात आल्यानंतर कर्मचार्‍यांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली.

यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा नाशिक एसीबीचे पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलिस अधीक्षक एन.एस.न्याहळदे, पोलिस उपअधीक्षक सतीश डी.भामरे (वाचक) यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शशीकांत श्रीराम पाटील, पोलिस निरीक्षक एन.एन.जाधव, पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव, एएसआय दिनेशसिंग पाटील, एएसआय सुरेश पाटील, हवालदार अशोक अहिरे, हवालदार सुनील पाटील, हवालदार रवींद्र घुगे, हवालदार शैला धनगर, पोलिस नाईक मनोज जोशी, नाईक सुनील शिरसाठ, नाईक जर्नादन चौधरी, कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, कॉन्स्टेबल महेश सोमवंशी, कॉन्स्टेबल नासीर देशमुख, कॉन्स्टेबल ईश्वर धनगर, कॉन्स्टेबल प्रदीप पोळ आदींच्या पथकाने यशस्वी केला.