Private Advt

पनवेल एक्स्प्रेसमधून 68 हजारांचा मुद्देमाल लांबवला : भुसावळातील आरोपी जाळ्यात

भुसावळ : पनवेल एक्सप्रेसने नवागढ ते पनवेल असा प्रवास करीत असलेल्या कुटुंबातील 68 हजारांचा मुद्देमाल असलेली पर्स लांबवणार्‍या भामट्याच्या भुसावळ लोहमार्ग पोलिसांनी आरपीएफच्या संयुक्त कारवाईत मुसक्या आवळल्या आहेत. अमोल रवींद्र भोवते (38, रा.आर.पी.डी.रोड, व्दारकानगर, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. अवघ्या सहा तासात आरोपीच्या मुसक्या आवळण्यात यंत्रणेला यश आले असून संपूर्ण मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.

दाम्पत्याचे लक्ष विचलीत होताच पर्स लांबवली
तक्रारदार मोहमद अहमद अब्दुल गनी (35, रा.अंधेरी ईस्ट, मुंबई) हे 7 डिसेंबर रोजी कुटुंबासह पनवेल एक्सप्रेसने नवागढ ते पनवेल असा प्रवास करीत असताना भुसावळ स्थानक आल्यानंतर गनी हे प्लॅटफार्मवर उतरले तर त्यांच्या पत्नी वॉशला गेल्यानंतर चोरट्याने त्यांची पर्स लांबवली. या पर्समध्ये 57 हजार 72 रुपयांचे सोन्याचे दागिने, 10 हजार 500 रुपयांचा मोबाईल मिळून 67 हजार 872 रुपयांचा मुद्देमाल होता. नाशिक येथे तक्रार दिल्यानंतर हा गुन्हा भुसावळ लोहमार्ग पोलिसात वर्ग करण्यात आला होता.

गोपनीय माहितीवरून आवळल्या मुसक्या
लोहमार्ग पोलिसांना चोरीची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा बल व लोहमार्ग पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केल्यानंतर तो यार्डमध्ये आढळताच त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. आरोपीच्या ताब्यातून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला. तपास सहाय्यक फौजदार बबन शिंदे करीत आहेत.

यांनी आवळल्या मुसक्या
ही कारवाई औरंगाबाद लोहमार्गच्या पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, विभागीय सुरक्षा आयुक्त क्षितीज गुरव व भुसावळ लोहमार्गचे पोलिस निरीक्षक विजय घेरडे, आरपीएफ पोलिस निरीक्षक राधाकिसन मीना यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सुनील इंगळे, एएसआय भरत शिरसाठ, हवालदार जगदीश ठाकुर, धनराज लुले, दिवाणसिंग राजपूत, अजीत तडवी, सागर खंडारे, आरपीएफ उपनिरीक्षक ए.के.तिवारी, एएसआय शुक्ला, आरक्षक भूषण पाटील, भजनलाल आदींच्या पथकाने केली.