युवारंगासह एनएसएस शिबिरांचे आयोजन करावे

शिंदखेडा। विद्यापीठ स्तरीय युवारंग, महाविद्यालय स्तरावर एन.एस.एस. शिबिरांचे  आयोजन करण्यात यावे, अशी मागणी विद्यापीठ विकास मंचच्यावतीने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.ई.वायूनंदन यांच्याकडे सिनेट सदस्य अमोल मराठे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

कोविडमुळे दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आता महाविद्यालये सुरू झालेली आहेत. विद्यार्थ्यांची महाविद्यालयात उपस्थितीही लक्षणीय वाढलेली आहे. महाविद्यालये बंद असल्यामुळे मागील काळात विविध स्पर्धा, स्नेहसंमेलने, शिबिरे, कार्यशाळा, आदी सर्व उपक्रमांपासून विद्यार्थी वंंचित होते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळेल, असे कोणतेही उपक्रम विद्यापीठ किंवा महाविद्यालय स्तरावर न झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाच्या प्रक्रियेत बाधा निर्माण झालेली आहे. आता प्रत्यक्ष महाविद्यालये सुरू झाल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाला सुरुवात झालेली असतांना विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाच्या आणि सर्वांगीण विकासासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे महत्वाचे आहे. विद्यार्थी विकास विभागाच्या अंतर्गत विद्यापीठ स्तरीय युवारंग, महाविद्यालय स्तरावर एन.एस.एस. शिबिरे, व्यक्तिमत्व विकास शिबीर, युवती सभा, स्वयंसिद्धा अभियान, विद्यापीठस्तरीय नेतृत्व विकास शिबीर, मैत्री शिबीर आदी उपक्रम व विविध स्पर्धांचे आयोजन तात्काळ करण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून केलेली आहे.

सिनेटच्या सभेत आवाज उठविणार
सर्व उपक्रमांचे विद्यापीठाच्यावतीने याच सत्रात नियोजन-वेळापत्रक करून संबंधित विभाग व सर्व महाविद्यालयांना आयोजन करण्यासंदर्भात सूचित करावे, अशी आग्रही मागणी अमोल मराठे यांनी केली आहे. तसेच गुरुवारी, 9 डिसेंबरला होणार्‍या सिनेटच्या सभेत या विषयावर आवाज उठविणार असल्याचे अमोल मराठे यांनी सांगितले.