धुळ्यात 67 लाखांचा गुटखा जप्त : मालेगावातील दोघे जाळ्यात

चाळीसगाव रोड पोलिसांनी पाठलाग करून संशयितांच्या आवळल्या मुसक्या

 

धुळे-  राज्यात प्रतिबंधीत असलेल्या गुटख्याची वाहतूक करणारा ट्रक चाळीसगाव रोड पोलिसांनी पाठलाग करून अडविला. त्यात ट्रकसह सुमारे 67 लाखांचा गुटखा जप्त केला. त्यामुळे गुटखा तस्करांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील हॉटेल इस्लामी ढाब्याजवळ शनिवारी, 4 रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास कारवाई करण्यात आली. याप्रकरणी ट्रक चालक शेख हारुन शेख हुसेन (48, रा.गल्ली नं.9, आझादनगर, मालेगाव जि.नाशिक) व क्लिनर मोहम्मद समील मोहम्मद सलीम (वय 19, रा.कमालपुरा, मालेगाव) यांनी अटक केली आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
मालेगावकडून जळगावकडे जाणार्‍या एका ट्रकमध्ये गुटखा असल्याची माहिती चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली होती. नंतर पोलीस पथकाने शनिवारी रात्री हॉटेल द्वारका लॉजसमोर सापळा रचला होता. यावेळी संशयित ट्रक (क्र. एम.एच.15 जी.व्ही.9741) येतांना दिसल्याने पोलिसांनी ट्रक थांबविण्याचा इशारा केला. परंतु चालकाने पोलीस पाहुन ट्रक न थांबविता वाहन पळविले. यावेळी पोलिसांनी ट्रकचा पाठलाग केला. मुंबई-आग्रा महामार्गावरील हॉटेल इस्लामी ढाब्याजवळ ट्रक अडविला. यावेळी पोलिसांनी ट्रकची पाहणी केली. तेव्हा त्यात खाकी रंगाच्या कार्टून व सफेद रंगाच्या गोण्या सुगंधीत पान मसाल्याचा सुगंध येत असल्याने खातरजमा केल्यानंतर त्यात पानमसाला व तंबाखूचा साठा मिळून आला.

ट्रकसह 67 लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी ट्रकमधून 36 लाख 27 हजार 800 रुपये किंमतीचा गुटखा, सहा लाख 27 हजार रुपये किंमतीची तंबाखू, 25 लाख रुपये किंमतीचा 12 चाकी मालट्रक असा मुद्देमाल जप्त केला. अटकेतील दोघा चालक व वाहकांना केवळ गुटखा वाहतुकीची जवाबदारी देण्यात आली होती. त्यामुळे हा माल नेमका कुणाचा व कुणाला पाठविण्यात येत होता. याबाबतची चौकशी चाळीसगाव रोड पोलिसांकडून सुरू आहे.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, पोलीस उपअधीक्षक दिनकर पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक संदीप पाटील, उपनिरीक्षक एन.जी.चौधरी, उपनिरीक्षक नासीर पठाण, हवालदार पंकज चव्हाण, कैलास वाघ, भुरा पाटील, अविनाश पाटील, संदीप कढरे, हेमंत पवार, स्वप्नील सोनवणे, सोमनाथ चौरे, प्रशांत पाटील, शरद जाधव, चालक किरण राजपूत आदींच्या पथकाने केली.

Copy