Private Advt

एस.टी.चा चालकांचा संप :  ट्रॅव्हल्स चालकांची दिवाळी

भुसावळात प्रवाशांना भाडेवाढीचा शॉक : आरटीओ अधिकार्‍यांच्या उपस्थितीत होतेय प्रवाशांची वाहतूक

भुसावळ : एस.टी.कर्मचार्‍यांनी विविध मागण्यांसाठी संपाची हाक दिल्याने प्रवाशांचे एकीकडे हाल होत असताना दुसरीकडे ट्रॅव्हल्स चालकांची मात्र वाढीव दरामुळे दिवाळी झाली आहे तर प्रवाशांचे मात्र दिवाळे निघत आहे. दरम्यान, प्रादेशिक परीवहन विभागातर्फे प्रवाशांचे होणारे हाल दूर करण्यासाठी भुसावळ बसस्थानकात खाजगी क्रुझर, स्कूल बस, काली पिलीसह अन्य गाड्या भरून प्रवाशांचे होणारे हाल दूर केले जात आहे. औरंगाबाद, सिल्लोड, बीड, हरीयाणा येथे गाड्या भरून जात असल्याने प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

शहरात आरटीओ अधिकारी दाखल
बुधवारपासून येथे आरटीओ अधिकारी दाखल झाले आहे. सहा.प्रादेशिक परीवहन अधिकारी गणेश पाटील, मोटार वाहन निरीक्षक अविनाश दुसाणे, सहा.मोटर वाहन निरीक्षक मयुरी चौधरी हे अधिकारी बुधवारपासून येथे बसस्थानकात दाखल आहेत. प्रादेशिक परीहन विभागातर्फे मयुरी चौधरी यांना भुसावळ बसस्थानक संपर्क प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. यावल, रावेर, बोदवड, मुक्ताईनगर, जामनेर सोबतच औरंगाबाद बीड, सिल्लोड आणि हरीयाणा राज्यातही एक क्रुझर पाठविण्यात आली. बुधवारी 12 गाड्या लांब पल्यासाठी पाठविल्यात तर गुरूवारी सुध्दा 17 गाड्या लांब पल्यांसाठी पाठविल्या आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोही यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्हाभरात अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.

आरटीओंना पाहून पळणार्‍या वाहनांना थांबविले
बसस्थानकाच्या परीसरात खाजगी वाहन चालक प्रवासी भरीत असतांनाच आरटीओची गाडी आल्याने अधिकार्‍यांना पाहून पळ काढणार्‍या वाहन धारकांना अधिकार्‍यांनी थांबवित प्रवाशांचे हाल होणार नाही, त्यासाठी तुम्ही गाड्या भरा, कुणालाही त्रास होईल असे काहीही करू नका, प्रवाशांना सुरक्षित प्रवास करून इच्छीतस्थळी गावाला सोडा, तुम्हाला कोणीही रस्त्यात अडविणार नाही अश्या सूचना अधिकारी गणेश पाटील यांनी दिल्यात.

ट्रॅव्हल्सचे भाडे दुप्पट
महामंडळाच्या बस बंद असल्याने प्रवासी वाट्टेल ते भाडे मोजत असून आपल्या गावाला जात आहे. बस बंद असल्याने प्रवासी ट्रॅव्हल्सकडे वळत आहेत. प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे ट्रॅव्हल्स व्यावसायीकांनी सुध्दा मोठ्या प्रमाणावर भाडेवाढ केली आहे. परीणामी प्रवाशांच्या खिश्याला आर्थिक फटका बसत आहे मात्र प्रवास करण्यास अन्य गाड्याचा पर्याय नसल्याने प्रवासी हे जास्तीचे भाडे मोजून प्रवास केला जात आहे.