Private Advt

धक्कादायक ! : युवकासह महिलेचा नदीपात्रात बुडाल्याने मृत्यू

बालकाला वाचवण्याच्या प्रयत्नात घडली दुर्घटना

शहादा : नदीत बुडत असलेल्या बालकाला वाचवण्याच्या प्रयत्नात युवकासह महिलेचा नदीपात्रात बुडाल्याने मृत्यू झाला. ही घटना अक्कलकुवा तालुक्यातील आमलाबारी गावालगतच्या नदीवर घडली. फैजान शेख सज्जाद (वय 21) व त्याची मावशी नौरून्नीसा अशपाक तेली (35) अशी मयतांची नावे आहेत. ही दुर्दैवी घटना शनिवार, 6 रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली.

दोघांच्या मृत्यूने हळहळ
अक्कलकुवा येथील एका संस्थेत शिपाई पदावर असलेले सज्जात शेख (गांधी नगर, शहादा) हे सुट्टीमुळे शहादा येथे आले होते. बी. फार्मसीच्या शेवटच्या वर्षाचे शिक्षण घेत असलेला त्यांचा मुलगा फैजान शेख सज्जात हा शनिवारी सकाळी आपली मावशी नौरून्नीसा अशपाक तेली व तिच्या दोन मुलांसह अक्कलकुवा तालुक्यातील आमलाबारी येथे पर्यटनासाठी आले होते.
दुपारी अंघोळ करीत असताना त्यांच्यासोबत असलेला एक बालक पाण्यात बुडत असल्याचे लक्षात येताच फैजान शेख हा त्याला वाचवण्यासाठी गेला. त्यावेळी त्याची मावशी नौरूणन्नीसा तेली याही त्याला सहकार्य करण्यासाठी गेल्यानंतर बालक वाचला परंतु यात फैजान शेख व नौरूण्णीसा तेली या दोघांचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच शहादा शहरातील गांधीनगर भागात शोकाकुल वातावरण झाले. शहादा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष शेख जहीर शेख बशीर यांनी याबाबत अक्कलकुवा पोलिसांशी संपर्क साधून तातडीने मदतीचे पोलीस प्रशासनाला विनंती केल्यामुळे दोघा मयतांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.