अपिल फेटाळले : माजी आमदार संतोष चौधरींची औरंगाबाद खंडपीठात याचिका

जिल्हा बँक निवडणूक : उच्च न्यायालयाच्या निकालाकडे लागले लक्ष

भुसावळ : जिल्हा बँक निवडणुकीत भुसावळातील राष्ट्रवादीचे माजी आमदार संतोष छबीलदास चौधरी यांचा विकास सोसायटी गटातून अर्ज बाद झाल्यानंतर त्यांनी विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक यांच्याकडे अपिल दाखल केले होते. या अपिलावर सुनावणी झाल्यानंतर चौधरी यांचे अपिल फेटाळण्यात आल्यानंतर त्यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात धाव घेत सोमवारी अपिल दाखल केले.

आता उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे लागले लक्ष
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आतापर्यंत महाविकास आघाडीच्या सहा जागा बिनविरोध निवडून आल्याने निवडणुकीत रंगत आली असतानाच भाजपा खासदार रक्षा खडसे, स्मिता वाघ, माधुरी अत्तरदे व भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यासह काही दिग्गजांचे अर्ज बाद झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. माजी आमदार चौधरी यांनी अर्ज बाद झाल्यानंतर सहकारी संस्थेचे नाशिक विभागीय निबंधक यांच्याकडे अपिल दाखल केले मात्र तेथेही अपिल फेटाळल्यानंतर चौधरी यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेत सोमवारी अपिल दाखल केले. चौधरी यांनी सांगितले की, सोमवारी अपिल दाखल करण्यात आले असून सुप्रीम कोर्टापर्यंत आपण लढणार आहोत.

Copy