Private Advt

साकेगावजवळ तिहेरी अपघात : दुचाकीस्वार ठार

वृत्तपत्र कर्मचार्‍याच्या मृत्यूने भुसावळातील रामानंद नगरात शोककळा : नवोदय विद्यालयाजवळ हवा दिशादर्शक फलक

भुसावळ : विरूद्ध दिशेने आलेला ट्रॉला समोरून येणार्‍या पीकअप व्हॅनवर धडकल्यानंतर त्याचवेळी दुचाकीला वाहनांची धडक लागल्याने झालेल्या तिहेरी अपघातात जळगावातील एका वृत्तपत्रातील कर्मचारी जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाजवळ घडली. या अपघातात चालकासह दोघे जखमी झाले आहेत. मुकेश रामकुमार परदेशी (35, रा.जामनेर रोड, रामानंद नगर, भुसावळ) असे ठार झालेल्या कर्मचार्‍याचे नाव आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले.

ट्रालाची पिकअप व्हॅनला धडक
समजलेल्या माहितीनुसार, साकेगाव येथील उड्डाणपुलाच्या उतारावर शनिवारी रात्री सुमारे दोन वाजेच्या सुमारास भुसावळकडून जळगावकडे निघालेल्या ट्रॉला (जी.जे.12 बी.वाय.9521) ने जळगावकडून भुसावळकडे कोंबड्या वाहून नेणार्‍या पिकअप व्हॅन (एम.एच.14 ई.एम.4402) ला जबर धडक दिल्याने व या वाहनांचा फटका पाठीमागून दुचाकी (एम.एच.19 डी.जी.0224) वर येत मुकेश परदेशी (35) यांना बसला. या अपघातात परदेशी यांना बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीचा चुराडा झाला. या अपघातात वाहनांवरील चालकही किरकोळ जखमी झाले. जखमींना डॉ.उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले.

पोलीस प्रशासनाची अपघातस्थळी धाव
अपघाताची माहिती मिळताच भुसावळ तालुका पोलीस स्थानकाचे निरीक्षक विलास शेंडे, शहर स्थानकाचे निरीक्षक प्रतापराव इंगळे, एएसआय राठोड, हेड कॉन्स्टेबल काझी व हेड कॉन्स्टेबल भोई यांच्यासह बाजारपेठ पोलीस कर्मचारी आणि नशिराबाद टोलनाका कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली.

पतीच्या मृत्यू वार्ता ऐकताच पत्नीची हरपली शुद्ध
भुसावळातील रामानंद नगरातील रहिवासी असलेल्या मुकेश परदेशी यांच्या अपघाती मृत्यूची वार्ता ऐकताच त्यांच्या पत्नीची शुद्धच हरपली. शुक्रवारीच मुकेश यांनी जळगावस्थित मेहुण्यांशी संपर्क साधून यंदाच्या दिवाळीत भाच्यांसाठी चांगले गिप्ट आणण्याबाबत चर्चा केली होती तर मुकेश यांच्या वडिलांचा एक पाय अधू असल्याने दोन दिवसात नाशिक येथे जावून आपण कृत्रिम पाय बसवू, असे त्यांनी वडिल रामकुमार परदेशी यांना सांगितले होते. मुलाच्या अपघाती मृत्यूने त्यांच्यावरही मोठा मानसिक आघात झाला. मयत मुकेश यांच्या मृतदेहावर शवविच्छेदन झाल्यानंतर शनिवारी दुपारी एक वाजता शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, आई, वडील, भाऊ, दोन बहिणी, मुलगा व मुलगी असा परीवार आहे.

अपघातानंतर उड्डाणपुलाखाली पडल्या लोखंडी आसारी
सूत्रांच्या माहितीनुसार जळगावकडे भरधाव वेगात निघालेल्या ट्रॉलात मोठ्या प्रमाणावर लोखंडी आसारी भरण्यात आल्या होत्या. पिकअप वाहनावर ट्रॉला आदळल्यानंतर त्यातील आसारी उड्डाणपुलाखाली कोसळल्या व सुदैवाने मध्यरात्रीची वेळ असल्याने याचवेळी कुणीही वाहनधारक वा पादचारी नसल्याने अप्रिय घटना टळली. दरम्यान, नवोदय विद्यालयाजवळ जळगावकडे जाण्याची दिशा दर्शवणारा दिशादर्शक फलक असावा, अशी मागणी आता अपघातानंतर केली जात आहे. दरम्यान, साकेगाव येथील मुळातच अपघातस्थळ वळणाचे व गोलाकार असल्याने येथे वाहनधारकांना अंदाज येत नसल्याने अपघात होत असल्याचे सांगण्यात आले. या संदर्भातही उपाययोजना होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.