Private Advt

बायोडिझेलची अवैध विक्री : तिघांना अटक

भुसावळ-वरणगाव महामार्गावर जळगाव गुन्हे शाखेची गोपनीय माहितीवरून धडक कारवाई : 32 लाखांचा मुद्देमाल जप्त

भुसावळ : भुसावळ-वरणगाव दरम्यान अवैधरीत्या बायोडिझेलची काळ्या बाजारात विक्री होत असल्याची गोपनीय माहिती जळगाव गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर पथकाने छापा टाकत तिघांच्या मुसक्या आवळत 32 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईने अवैधरीत्या बायोडिझेल विकणार्‍यांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली. बुधवार, 27 रोजी पहाटे 4.40 वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. युसूफ खान नूर खान (54, सिद्धेश्‍वर नगर, वरणगाव), आफताब अब्दुल कादर राजकोटीया (21, हिना पार्क, वरणगाव, मूळ रा.हुसेनी चौक, 420 टकीया स्टेट, कालावड, जि.जामनगर, गुजरात) व टँकर चालक बेचू मौर्या चंद्रधन मौर्या (41, खरगपूर, मेहनगर, आजमगड, उत्तरप्रदेश) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

बायोडिझेलसह टँकर जप्त
गुन्हे शाखेच्या पथकाने भुसावळ-वरणगाव महामार्गावरील गरीब नवाज ढाब्याजवळ छापा टाकल्यानंतर जमिनीत अवैधरीत्या बायोडिझेलचा साठा करण्यात आल्याचे दिसून आले तसेच बायोडिझेल भरलेले टँकर (डी.एन.09 जे.9663) जप्त केले तसेच बायोडिझेल विक्री करण्यासाठी लागणारी साधनसामुग्री जप्त करण्यात आली. त्यात 20 लाख 75 हजारांचे बायोडिझेल, दहा लाखांचा टँकर, डिस्पेन्सर, नोझेल मशीन, पाईप व अन्य सामान मिळून 31 लाख 95 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तीनही संशयीतांविरोधात वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले, सहा.निरीक्षक जालिंदर पळे, एएसआय युनूस शेख इब्राहीम, हवालदार सुनील पंडित दामोदरे, हवालदार दीपक शांताराम पाटील, नाईक रणजीत अशोक जाधव, नाईक किशोर ममराज राठोड, कॉन्स्टेबल श्रीकृष्ण देशमुख, चालक दर्शन हरी ढाकणे, चालक भारत शांताराम पाटील आदींच्या पथकासह वरणगाव पोलीस ठाण्याचे सहा.निरीक्षक आशीष अडसुळ, एएसआय नरसिंग चव्हाण, चालक ईस्माईल इब्राहीम आदींच्या पथकाने केली.