Private Advt

भुसावळात लक्झरी-पिकअपमध्ये अपघात : चालक ठार

लक्झरी चालकासह तीन प्रवासी जखमी : मध्यरात्री अपघात : लक्झरी न उलटल्याने प्रवासी बचावले

भुसावळ : भरधाव लक्झरी व मालवाहु छोटा हत्ती पिकअप वाहनात समोरा-समोर धडक होवून झालेल्या अपघातात पिकअप वाहनातील धुळ्याच्या चालकाचा जागीच मृत्यू झाला तर दोन सह प्रवासी जखमी झाले. राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे उड्डाणपुलावर शनिवारी मध्यरात्री हा अपघात झाला. सुदैवाने लक्झरी उलटली नाही अन्यथा मोठी जीवीत हानी होण्याची भीती होती. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

समोरा-समोर धडकली वाहने
सूत्रांच्या माहितीनुसार, यवतमाळ येथून महेंद्र ट्रॅव्हल्सची लक्झरी (जी.जे.19 एक्स.9596) सुमारे 35 प्रवाशांना घेवून भरधाव वेगाने सुरतकडे निघाली असताना भुसावळ येथील रेल्वे उड्डाण पुलाजवळ जळगावकडून भुसावळकडे येणार्‍या मालवाहु पिकअप (एम.एच.18 बी.जी.04) वर आदळली. या अपघातातील पिकअपमधील चालक किशोर निंबा गिरासे (38, नगावबारी, देवपूर, धुळे) हे जागीच ठार झाले तर पिकअपमधील अन्य दोघे जखमी झाले तसेच लक्झरी चालकही जखमी झाला. अपघाताची माहिती कळताच पोलीस उपधीक्षक सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठचे प्रभारी निरीक्षक प्रताप इंगळे, पालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार व पोलीस कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. करणी सेनेचे खान्देश अध्यक्ष निखील राजपूत व सहकार्‍यांनी जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ हलवण्याकामी मदत केली.

लक्झरीतील प्रवासी बालंबाल बचावले
सूत्रांच्या माहितीनुसार, ट्रॅव्हल्समध्ये सुमारे 35 प्रवासी सुरतसाठी प्रवास करीत होते. दोन्ही वाहनांमध्ये समोरा-समोर धडक झाल्यानंतर अपघातानंतर लक्झरी रस्त्याच्या कडेला सुदैवाने अधांतरी लटकली. लक्झरी रस्त्याच्या खाली कोसळली असतीतर प्रवाशांच्या जीवावरही बेतण्याची भीती होती. दरम्यान, पोलिसांनी लक्झरीतील 35 प्रवाशांना रेल्वे स्थानकावर आणल्यानंतर त्यांची सुरत जाण्यासाठी व्यवस्था केली. बाजारपेठ पोलिसात राजेंद्र पद्मसिंग गिरासे (भगवती नगर, देवपूर, धुळे) यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

मयत चालक धुळ्यातील रहिवासी
अपघातात मयत झालेले चालक किशोर निंबा गिरासे (38, नगावबारी, देवपूर, धुळे) हे धुळ्यातील रहिवासी आहेत. शुक्रवारी सायंकाळी अकोला येथे टेबल व खुर्च्या पोहोचवण्यासाठी ते स्वतःच्या माल वाहतूक वाहनाने एका लेबर व कंपनीच्या कर्मचार्‍यासह निघाले होते मात्र भुसावळ येथे झालेल्या अपघातात गिरासे यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात आली. भुसावळ नगरपालिका रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मयत गिराणे यांच्या पश्‍चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा व मुलगी असा परीवार आहे.