वर्षभरात ताशी 120 वेगाने एक्स्प्रेस गाड्या धावण्याचे नियोजन

मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर अनिलकुमार लाहोटी : राज्य सरकारच्या परवानगीनंतर पॅसेंजर गाड्यांचा निर्णय

भुसावळ : राज्यातील कोरोना अद्याप संपला नसल्याने तूर्त पॅसेंजर गाड्या सुरू करण्यात येणार नाहीत मात्र राज्य शासनाने याबाबत परवानगी दिल्यानंतर मुंबई लोकलच्या धर्तीवर पॅसेंजर गाड्या सुरू करण्यात येतील, अशी माहिती मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर अनिलकुमार लाहोटी यांनी येथे दिली. भुसावळ विभागाच्या दौर्‍यावर लाहोटी हे बुधवार, 22 रोजी आले असता सायंकाळी त्यांनी प्लॅटफार्म क्रमांक आठवर माध्यमांशी संवाद साधला. लाहोटी म्हणाले की, सध्या मध्य रेल्वेत ताशी 110 वेगाने एक्स्प्रेस गाड्या चालवल्या जात असल्यातरी वर्षभरात ईगतपुरी-भुसावळ, भुसावळ-बडनेरा, भुसावळ-खंडवा या मार्गावर ताशी 120 ते 130 वेगाने एक्स्प्रेस गाड्या चालवण्याचे नियोजन आहे.

अनुकंपा तत्वावर नऊ जणांना नोकरी
भुसावळ रेल्वे विभागात कोरोनाच्या कठीण काळात नऊ कर्मचार्‍यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या परीवाराला शंभर टक्के भरपाई देण्यात आली असून कुटुंबातील सदस्याला नोकरीचा लाभ (अनुकंप) देण्यात आला आहे मात्र दोन ते तीन कर्मचार्‍यांच्या कुटुंबात मुले शिक्षण घेत असल्याने नोकरीचे वय झाल्यानंतर त्यांना नोकरीचा लाभ दिला जाणार आहे. भुसावळात पत्रकारांसाठी पार्किंग व्यवस्थेसंदर्भात डीआरएम यांना विचारणा करण्यात येईल, असे एका प्रश्‍नाच्या उत्तरादाखल ते म्हणाले.

बसस्थानक रस्त्याचा चेंडू पालिकेच्या कोर्टात
भुसावळातील सर्वाधिक नादुरुस्त असलेल्या भुसावळ स्टेशन रस्त्याच्या दुर्दशेबाबत जीएम यांना विचारणा केली असता त्यांनी हा प्रश्‍न पालिकेचा असल्याने पालिकेनेच रस्ता करावा, असे सांगत हात झटकल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात आले. राज्यात पॅसेंजर गाड्या अद्याप का सुरू करण्यात येत नाही या प्रश्‍नावर जीएम यांनी निर्णयाचा चेंडू राज्य सरकारकडे टोलवला. केवळ आरक्षीत गाड्या चालवण्यात येत असून राज्य सरकारच्या परवानगीनंतर पॅसेंजर गाड्या सुरू करण्यात येतील, असे ते म्हणाले.

भुसावळ-भादली लाईन पुढील वर्षी होणार
जीएम लाहोटी म्हणाले की, बुधवारी भुसावळ-पाचोरा लाईनची पाहणी करून तिसर्‍या व चौथ्या लाईनचे सर्वेक्षण करण्यात आले. तिसर्‍या लाईनच्या कामाला सुरूवात झाली आहे तर भादली-जळगाव या चौथ्या लाईनच्या कामाला सुरूवात झाली असून भुसावळ-भादली चौथ्या लाईनच्या कामाला पुढील वर्षी सुरूवात होणार असल्याचे ते म्हणाले.

पीजेसह औरंगाबाद मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण
पाचोरा-जामनेर तसेच चाळीसगाव-औरंगाबाद व जळगाव-औरंगाबाद-जालना या प्रस्तावीत रेल्वे लाईनचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून पीजेचा जानेवारी तर वरील रेल्वे लाईनचा मार्चपर्यंत अहवाल रेल्वे बोर्डाकडे सादर करण्यात येईल, अशी माहिती जीएम लाहोटी यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरादाखल दिली. यावेळी स्थानकावर डीआरएम एस.एस.केडीया, एडीआरएम नवीन पाटील, वरीष्ठ परीचालन प्रबंधक आर.के.शर्मा, स्टेशन डायरेक्टर जी.आर.अय्यर आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

भुसावळात रेल्वे इंजिनाचे उद्घाटन
जीएम लाहोटी यांनी बुधवारी सकाळी रेल्वे स्थानकाला भेट दिली. स्थानकावर एसी वेटींग रूमसह जनरल रूमची त्यांनी पाहणी केली तसेच स्टेशन व साऊथ साईडची पाहणी करण्यात आली. स्टेशनवरील गार्ड लॉबीचीपाहणी केल्यानंतर इंटरलॉकींगवरही चर्चा झाली. पीओएचला भेट देण्यात आली व टॉवर वॅगनचे उद्घाटन झाले तसेच व्हील सेक्शनचे इन्स्पेक्शन करण्यात आले तसेच स्पेरीलॉगचे उद्घाटन झाले. दरम्यान, प्लॅटफार्म क्रमांक चारवर ‘भारत’ नावाच्या एसी व बॅटरीवर चालणार्‍या इंजिनाचे जीएम यांनी उद्घाटन केले. मुख्य विद्युत अभियंता हिमांशू रामदेव यांनी इंजिनाची माहिती दिली. डीआरएम एस.एस.केडीया उपस्थित होते. दरम्यान, पाचोरा रेल्वे स्थानकाच्या पाहणीत सफाई व पथनाट्याचे सादरीकरण झाल्यानंतर दहा हजारांचे बक्षीस देण्यात आले तसेच भुसावळ स्थानकावरही स्वच्छतेबद्दल समाधान व्यक्त करून जीएम यांनी दहा हजारांचे बक्षीस दिले.

Copy