करोना संसर्गांनंतर शरीरात ‘इतके’ महिने अँटीबॉडी

लंडन : करोनाचा संसर्ग झाल्यानंतर रुग्णांच्या शरीरामध्ये नऊ महिन्यांपर्यंत अँटीबॉडी राहतात, असा निष्कर्ष एका संशोधनामध्ये काढण्यात आला आहे. या संशोधनामध्ये इटलीतील एका संपूर्ण गावातून माहिती संकलित करण्यात आली होती.
पडुआ विद्यापीठ आणि लंडनमधील इम्पेरियल कॉलेजमधील संशोधकांनी यासाठी संशोधन केले. वो नावाच्या या गावाचा अभ्यास करण्यात आला. सुमारे तीन हजार लोकसंख्या असणाऱ्या या गावातील ८५ टक्के नागरिकांची चाचणी घेण्यात आली. यामध्ये नागरिकांची गेल्या वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये चाचणी घेण्यात आली. त्यानंतर मे आणि नोव्हेंबरमध्येही नोंदी घेण्यात आल्या. त्यानुसार, नोव्हेंबरमध्येही या नागरिकांच्या शरीरामध्ये लक्षणीय प्रमाणात अँटिबॉडी दिसून आल्या. विशेष म्हणजे लक्षणे असणाऱ्या आणि लक्षणे नसणाऱ्या दोन्ही रुग्णांमधील अँटिबॉडीच्या प्रमाणात फार फरक दिसून आला नाही.
इम्पेरियल कॉलेजमधील इलारिया डोरिगट्टी म्हणाल्या, ‘लक्षणे असणाऱ्या आणि नसणाऱ्या दोन्ही प्रकारच्या रुग्णांमधील अँटिबॉडीचे प्रमाण सारखेच दिसून आले. त्यामुळे, रोगप्रतिकारक शक्ती ही लक्षणे किंवा संसर्गाच्या तीव्रतेवर अवलंबून नाही, हे सिद्ध होते.’

 

.