Private Advt

कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यास मृत्यूचा धोका 95 टक्क्यांपर्यंत कमी

नवी दिल्ली : देशात कोरोना लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. अशातच या लसींच्या परिणामकारकतेसंदर्भात एक सकारात्मक माहिती समोर येत आहे. जर कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तर मृत्यूचा धोका हा 95 टक्क्यांपर्यत कमी होतो. भारतीय संशोधन अनुसंधान संस्था अर्थात आयसीएमआऱच्या एका अभ्यासातून हे समोर आलं आहे. ज्यांनी लस घेतली नाही त्यांच्या तुलनेत लस घेतलेल्या लोकांना मृत्यूचा धोका फारच कमी आहे. पहिला डोस घेतलेल्यांना मृत्यूचा धोका 0.18 टक्के होता तर दोन्ही डोस घेतलेल्यांना हा धोका 0.05 टक्के होता.

तामिळनाडूच्या पोलीस दलातील एक लाख 17 हजार 524 जवानांच्या आधारे एक रिसर्च करण्यात आला. या संशोधनादरम्यान लस घेतलेले जवान आणि लस न घेतलेले जवान यांच्यापैकी किती जणांचा कोरोनाने मृत्यू झाला याबद्दल निरीक्षण करण्यात आलं. 1 फेब्रुवारी 2021 ते 14 मे 2021 या कालावधीत हा रिसर्च करण्यात आला. या रिसर्चसाठी लसीचा एक डोस घेतलेले 32 हजार 792 कर्मचारी निवडण्यात आले. लसींचे दोन्ही डोस घेतलेले कर्मचारी 67673 होते तर 17059 पोलीस कर्मचाऱ्यांनी लस घेतली नव्हती. रिसर्चनुसार, 13 एप्रिल 2021 ते 14 मे 2021 या दरम्यान 31 पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यापैकी 4 जणांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले होते, तर 7 जणांनी एकच डोस घेतला होता. बाकीच्या 20 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली नव्हती. रिसर्चमधून समोर आलं आहे की, कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी लस प्रभावी आहे. ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरोना लसीचा एक डोस घेतला होता, त्यांना मृत्यूचा धोका 82 टक्क्यांपर्यंत कमी होता तर दोन्ही डोस घेतलेल्यांना हा धोका 95 टक्क्यांपर्यंत कमी होता असं आढळून आलं.