साईगीतानगरातील ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाचे बंद घर फोडले

साडेतीन लाखांचा ऐवज लंपास

जळगाव । खेडी परिसरातील साईगीतानगरात ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाकडे घरफोडी झाली असून चोरट्यांनी सुमारे साडेतीन लाखांचा ऐवज लंपास केला आहे. शहरात पुन्हा चोर्‍या, घरफोड्यांचे सत्र सुरू झालेले आहे.
साईगीतानगरातील चंचल टेकचंद शर्मा (वय ४१) हे कुटुंबासह महिनाभरापासून दिल्ली येथे गेलेले आहेत. त्यामुळे
त्यांचे घर बंद होते. चोरट्यांनी दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरातून प्रवेश केला. चोरट्यांनी सुमारे सात तोळे सोन्याचे दागिने, चांदीचे शिक्के व ५० हजार रुपयांचा ऐवज लांबविला आहे. चंचल शर्मा यांची रोहित रोडवेज नामक जळगावात ट्रान्सपोर्ट कंपनी आहे. त्यांच्याकडे घरकाम करणार्‍याला या घरफोडीचा प्रकार लक्षात आला.
याबाबत घरकाम करणार्‍याने शर्मा यांना कळविले. याबाबत चंचल शर्मा यांनी फिर्याद दिली. त्यावरुन शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.