राज्यातील 15 हजार रिक्तपदे भरण्यास अर्थमंत्रालयाची मंजूरी, अजित पवारांची घोषणा

मुंबई – राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाच्या कामकाजाला सुरुवात झाल्यावर भाजपाने विधिमंडळाच्या पायऱ्यांवरच प्रतिअधिवेशन घेण्यास सुरुवात केली. विरोधी पक्षाने केलेल्या या कृतीवर सभागृहात सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून आक्षेप घेण्यात आला. त्यानंतर विधानसभा तालिका अध्यक्षांच्या आदेशाने या प्रतिअधिवेशनावर कारवाई करण्यात आली. त्यावर विधानसभा अध्यक्षांच्या आदेशाने कारवाई झाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली.
विरोधी पक्षाच्या प्रतिविधानसभेवर करण्यात आलेल्या कारवाईनंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमचा आवाज कुणीही बंद करू शकत नाही. आम्ही याठिकाणी बोलणार. आज विधिमंडळाच्या सभागृहामध्ये सत्ताधारी पक्षाने आणीबाणी लावण्याचा प्रकार केला. महाराष्ट्रात सध्या असं सरकार सत्तेवर आहे त्यांनी अघोषित आणीबाणी लागू केली आहे. राज्य सरकारकडून लोकशाहीची हत्या झाली आहे. मार्शल पाठवून पत्रकारांचे कॅमेरे काढून घेतले गेले. ज्या प्रकारे माध्यमांच्या प्रतिनिधींना ढकलाढकल करण्यात आली हे चुकीचे आहे. आम्ही प्रसंगावधान दाखवले नसते तर वेगळे चित्र दिसले असते, असे फडणवीस म्हणाले.

भाजपच्या ‘त्या’ आमदारांवरही कारवाई करा; राष्ट्रवादी आक्रमक

भाजपनं विधान भवनाच्या आवारात प्रति विधानसभा भरवत सरकारचा निषेध केला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अधिकच आक्रमक झाली असून भाजपच्या इतर आमदारांवरही कारवाई करावी, अशी मागणी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. ‘याआधीच्या काळात आम्हीही विरोधी पक्षात होतो, मात्र आम्ही कधीही विधानभवनाच्या आवारात असं वर्तन केलं नाही. विधान भवनाच्या आवारात चुकीचे वर्तन करणाऱ्या विरोधी पक्षाच्या सदस्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली. ‘आज विधानसभेच्या कामकाजात अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत. मात्र, विरोधी पक्षातील सदस्य सभागृहात उपस्थित न राहता विधानभवनाच्या आवारात गोंधळ घालत आहेत. विरोध करण्यास मनाई नाही, मात्र लाऊडस्पीकर लावले जात आहेत हे अयोग्य आहे, असंही जयंत पाटील यांनी अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिलं.

माझा फोन टॅप करुन अमजद खान नावाचा कोड ठेवला; नाना पटोलेंचा गंभीर आरोप

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु असून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गंभीर आरोप केले आहेत. २०१६-१७मध्ये माझा फोन टॅप करण्यात आला होता. व माझ्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आलं होतं, असा गंभीर आरोप नाना पटोलेंनी सभागृहात केला आहे. तसंच, माझा फोन टॅप करुन माझं नाव अमजद खान असं ठेवलं गेलं, असंही पटोले यांनी म्हटलं आहे.
२०१६-१७ मध्ये मी खासदार असताना माझ्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचं काहीच काम नव्हतं. मला मिळालेल्या माहितीनुसार माझं नाव अमजाद खान नाव ठेवण्यात आलं होतं. केंद्रातले सध्याचे मंत्री रावसाहेब दानवे यांच्या पीएचा नंबरदेखील व खासदार संजय काकडे यांचा नंबरपण टॅप केला गेला. कोणाच्याही गोपनीयता भंग करण्याचा अधिकार कोणाला नाही, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, नाना पटोलेंनी उपस्थित केलेल्या फोन टॅपिंगच्या प्रश्नावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या प्रकरणाची उच्च स्तरिय चौकशी करुन सभागृहाला माहिती देण्यात येईल, अशी माहिती दिली आहे.

तीन कृषी विधेयक विधानसभेत सादर

केंद्र सरकारने तीन कृषी कायदे लागू केल्यानंतर ठाकरे सरकारने तीन कृषी विधेयक विधानसभेत सादर केली. या विधेयकावर बोलताना अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले, ”दिल्लीत लाखो शेतकरी आंदोलन करत आहेत. अख्ख्या जगाने याची नोंद घेतली. आंदोलनाच्या ठिकाणी करोनामुळे आणि इतर आजारांमुळे दगावले. एकाचा मृत्यू झाला, तरी आपण संवेदना व्यक्त करतो. पण, २०० पेक्षा जास्त बळी गेला. पण, दुर्दैव असं की, मंत्री यायचे, चर्चा करायचे आणि जायचे. शेतकऱ्यांनी भेटायला जायला म्हणून सांगितलं, तर शेतकऱ्यांच्या वाटेत खिळे ठोकले गेले. याची नोंद जगाने घेतली. टीका झाल्यावर खिळे काढले असं भुजबळ म्हणाले.

कंपन्यांनी कोणतं लॉलिपॉप दिलं – फडणवीस

देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारवर जोरदार शब्दात टीका केली. पीक विमा कंपन्यांना होणाऱ्या फायद्याची आकडेवारीच त्यांनी प्रति विधानसभेत वाचून दाखवली. तसेच, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून कंपन्याना फायदा का करून देत आहात. कंपन्यांनी कोणतं लॉलिपॉप दिलं, असा सवालही फडणवीसांनी राज्य सरकारला केला आहे.