Private Advt

भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरींना ‘अंतरीम’ दिलासा

मंगळवारी भुसावळ सत्र न्यायालयात जामिनावर सुनावणी : बाजारपेठ पोलीस ठाण्यात नोंदवला जवाब

भुसावळ : अतिक्रमणाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या भुसावळ पालिका मुख्याधिकार्‍यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी माजी आमदार संतोष चौधरींविरोधात सोमवार, 14 रोजी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शनिवारी भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयाने चौधरी यांना मंगळवारपर्यंत अंतरीम जामीन मंजूर केल्याने त्यांनी रविवारी दुपारी बाजारपेठ पोलीस ठाण्यात आपला जवाब नोंदवला. प्रसंगी चौधरी म्हणाले की, मुख्याधिकार्‍यांना आपण ओळखत नाही, पाहिलेले देखील नाही, राजकीय आकस व दबावापोटी आगामी निवडणुका डोळ्यापुढे ठेवून हा आपल्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्यात आला व खोट्या गुन्ह्यांना आपण भीक घालत नाही, असेही ते म्हणाले.

माजी आमदारांना ‘अंतरीम’ दिलासा
शनिवारी भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयाचे न्या.एस.बी.भन्साली यांनी माजी आमदार चौधरींना 15 हजारांच्या जात मुचलक्यावर मंगळवारपर्यंत अंतरीम (तात्पुरता) जामीन मंजूर केल्याने चौधरींना तूर्त दिलासा मिळाला आहे. मंगळवार, 22 जून रोजी पुन्हा जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. यावेळी बाजारपेठ पोलीस जामिनाबाबत आपले म्हणणे सादर करतील. दरम्यान, रविवारी चौधरी यांनी आपला जवाब सहा.निरीक्षक मंगेश गोंटला यांच्याकडे नोंदवला. याप्रसंगी वकील अ‍ॅड.जगदीश जगदीश कापडे, कृउबा सभापती सचिन चौधरी, सतीश घुले, आशिक खान शेरखान आदींची उपस्थिती होती.

राजकीय आकसापोटी गुन्हा : मुख्याधिकार्‍यांना ओळखत नाही
पोलीस ठाण्यात जवाब नोंदवल्यानंतर चौधरी हे बाहेर पडत असताना माध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधला. प्रसंगी चौधरी म्हणाले की, मुख्याधिकार्‍यांना आपण ओळखत नाही, पाहिलेले देखील नाही, राजकीय आकस व दबावपोटी आगामी निवडणुका डोळ्यापुढे ठेवून हा आपल्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असून खोट्या गुन्ह्यांना आपण भीक घालत नाही. ‘त्या’ जागेवर काहींनी बेकायदा कब्जा करून वॉचमन यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला व त्यावेळी वॉचमन कैलास शिरसाठ यांनी आपल्याला मदतीसाठी बोलावल्याने त्यांच्या मदतीसाठी आपण तेथे गेलो व कुणाला मदत करणे म्हणजे कायद्याने गुन्हा नाही, असे चौधरी यांनी सांगितले. त्या जागेवर केवळ रामदास सावकारे व अनिल भाकरे होते व त्यांनाच आपण ओळखतो मात्र अन्य लोकांनी मास्क लावल्याने त्यांना ओळखता आले नाही, असेही त्यांनी सांगितले.

जिल्हा अधीक्षकांकडून पोलीस संरक्षण घेणार
चौधरी म्हणाले की, आगामी काळात पालिकेच्या निवडणुका असून आपल्याविरोधात राजकीय षडयंत्राद्वारे खोटे गुन्हे दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेवून शासनाची रीतसर फी भरून पोलीस संरक्षण मागणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. शासनाचा कर्मचारी सोबत असल्यास खोट्या गुन्ह्यांना आळा बसेल, असेही त्यांनी सांगितले.

भुसावळातील अतिक्रमणाविरोधात आता लढा
भुसावळात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण वाढले असून काहींनी या माध्यमातून महिन्याला लाखोंची वसुली सुरू केली आहे. मी पालिकेत पदावर असताना भुसावळात दोन हजार दुकाने बांधण्यात आली मात्र आता तितकीच बेकायदा दुकाने उभारण्यात आल्याने पालिकेचा महसूल बुडत असल्याचे त्यांनी सांगत या संदर्भात नगरविकास मंत्र्यांना भेटून अतिक्रमण हटवण्यासंदर्भात मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.