राज ठाकरे यांना ‘ही’ गोष्ट पटत नाही

मुंबई – कोरोना काळात माझा वाढदिवस साजरा करण माल पटत नाही अससे  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना पत्र लिहून आवाहन केले आहे. येत्या १४ जून रोजी राज यांचा वाढदिवस आहे. दरवर्षी राज ठाकरेंच्या वाढदिवशी राज्यभरातून अनेक कार्यकर्ते त्यांच्या भेटीसाठी कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी येत असतात.

परंतु मागील वर्षभरापासून देशावर तसेच राज्यावर कोरोनाचं संकट आहे. अशास्थितीत गर्दी होऊ नये ही जबाबदारी ओळखून राज ठाकरेंनी मनसेच्या कार्यकर्त्यांना पत्र लिहिलं आहे. .

वाचा राज ठाकरेंनी लिहिलेलं पत्र जसंच्या तसं…

माझ्या प्रिय महाराष्ट्र सैनिकांनो,

सस्नेह जय महाराष्ट्र

दरवर्षी माझ्या वाढदिवसाला आपण भेटतो, तुम्ही फार प्रेमानं अनेक ठिकाणाहून येता. मलाही तुम्हाला भेटल्यावर आनंद होतो आणि अंगात नवा उत्साह संचारतो, ऊर्जा मिळते. तशी ऊर्जा जाहीर सभेतही मिळते. पण तिथे, तुम्ही नुसते दिसता, भेटत नाही. म्हणून माझ्या दृष्टीनं वाढदिवसाचा दिवस तुमच्या सहवासात, तुम्हाला भेटल्यानं खरा साजरा होतो. तुमच्या भेटीची मी वाट पाहत असतो.

मात्र हेही वर्ष बिकट आहे. मागच्या वर्षीसारखचं. अजूनही कोरोनानं महाराष्ट्राला घातलेला विळखा सोडलेला नाही. लॉकडाऊन उठतो आहे. हळूहळू सगळं पूर्वपदावर यायला लागलं आहे. परंतु परिस्थिती अजूनही गंभीर आहेच. आजचंच पाहा, महाराष्ट्रात एका दिवसांत १२ हजार २०७ नवे रुग्ण आढळले आणि १,६४,७४३ जण आताही उपचार घेत आहेत. अशा वातावरणात वाढदिवस वैगेरे साजरा करणं मनाला पटत नाही. माझे सहकारी म्हणून तुम्ही हे नक्की समजून घ्याल.