साडे पाच लाखाचा गुटखा जप्त; एक ताब्यात

शिरपूर। मुंबई-आग्रा महामार्गावरुन मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात गुटखा  तस्करी करणार्‍या वाहनावर 27 मे रोजी रात्री स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तालुक्यातील पळासनेरजवळ  कारवाई करत वाहनासह 5 लाख 37 हजार 720 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान, चालकाला अटक केली आहे. याप्रकरणी अन्नसुरक्षा अधिकारी किशोर बावस्कर यांनी 28 मे रोजी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन संशयित जयकुमार जैन याच्याविरुध्द अन्न सुरक्षा कायदा कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर असे, मध्य प्रदेशातील सेंधवाकडून महाराष्ट्रात शिरपूरकडे एका वाहनातून प्रतिबंधित असलेली सुगंधित तंबाखू, सुगंधित सुपारीची विक्रीच्या उद्देशाने चोरटी वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना मिळाली होती. त्याआधारे पथकाने शुक्रवारी सायंकाळी पळासनेर फाट्यावरील परमार हॉटेलजवळ उभे असलेले संशयित वाहन (क्र.एमएच-18 बीजी- 5946) आणि वाहनचालक जयकुमार रमेश जैन (वय 39, रा.आशीर्वाद हॉस्पिटलजवळ, बन्सीलाल नगर, शिरपूर) यास वाहनासह  ताब्यात घेत वाहनाची तपासणी केली. वाहनात 3 लाख 37 हजार 720 रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला होता.

ही कारवाई पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव  यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, पीएसआय सुशांत वळवी, पोहेकॉ. रफिक पठाण, श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, संदीप थोरात, प्रकाश सोनार, पोना.संदीप सरग, गौतम सपकाळे, राहुल सानप, सागर शिर्के, दीपक पाटील यांनी केली आहे.