काँगे्रसच्या बैठकीकडे प्रशासनाचे विशेष लक्ष ” बँका, बाजार समित्या, विवाह समारंभ, रुग्णालयातील गर्दीचे काय ?

आमदार शिरीष चौधरींचा सवाल : कायदा भंग करणार्‍यांवर गुन्हा दाखल होत असल्यास प्रशासनाच्या तत्परतेचे कौतुक ; ‘त्या’ बैठकीत पूर्वसूचना न देता कार्यकर्ते आल्याचा अदावा

रावेर : मी कायद्यावर विश्वास ठेवून काम करणारा काँग्रेसचा निष्ठावान कार्यकर्ता असून आम्ही चूक केली असल्यास व कायदा मोडला असल्यास त्याबद्दल जी कारवाई होईल त्याला सामोरे जाण्याची आमची तसेच पक्षासाठी अगदी प्राण पणाला लावायची आमची तयारी आहे मात्र जळगावातील काँग्रेसच्या बैठकीत पक्षावर निष्ठा असलेले कार्यकर्ते तिथे मोठ्या संख्येने जमले व त्यामुळे पदाधिकार्‍यांचा नाईलाज झाला. प्रशासनाने मात्र तत्परता दाखवून गुन्हा दाखल केल्याने यया तत्परतेचे कौतुक असल्याचा टोला आमदार शिरीष चौधरी यांनी लगावला आहे. जळगावात रविवार, 15 मे 2021 रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षा व उत्तर महाराष्ट्र प्रभारी आमदार प्रणिती शिंदे यांच्या दौर्‍यानंतर झालेल्या बैठकीनंतर कोविड नियमांचे उल्लंघण झाल्याने काँग्रेस पदाधिकार्‍यांवर गुन्हे दाखल झाल्याने या संदर्भात आमदार चौधरींनी आपली भूमिका मांडली.

अचानक आले कार्यकर्ते : आमदार चौधरी
आमदार चौधरी म्हणाले की, आमदार शिंदे या जळगावच्या दौर्‍यात पक्षाचे मुख्य पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते अशा मोजक्या लोकांशी चर्चा करणार होत्या व त्या दृष्टीने कोरोनाचे नियम पाळून बैठकीचे आयोजन करण्यात आले मात्र अचानक कुठलीही पूर्वसुचना न देता काँग्रेसचे कार्यकर्ते त्या बैठकीला आल्याने गर्दी होवून ती आवरणे कठीण झाले त्यामुळे माझ्यासह माझ्या पक्षातील सहकार्‍यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. बँका, बाजार समित्या, विवाह समारंभ, रुग्णालये येथेदेखील गर्दी होते मात्र तेथे फारसे लक्ष दिले जात नाही पण मात्र काँग्रेसच्या बैठकीतील गर्दीकडे प्रशासनाने विशेष लक्ष दिले तत्परता दाखवून गुन्हा दाखल केला. कायदा भंग करणार्‍या प्रत्येकाला शिक्षा होणार असेल तर प्रशासनाच्या तत्परतेचे कौतुकच करायला हवे, असा टोला आमदारांनी लगावत आमच्यावर जी कारवाई होईल त्याचे स्वागत करीत असल्याचे आमदार चौधरी म्हणाले.