शहरातील रस्त्यांसह इतर समस्या सोडवा

जळगाव- शहरातील रस्ते व इतर समस्या सोडवून नागरिकांना मुलभूत सुविधा उपलब्ध करुन द्या, या मागणीचे निवेदन बहुजन मुक्ती पार्टीतर्फे उपमहापौर कुलभूषण पाटील व आयुक्त सतीश कुलकर्णी यांना देण्यात आले. हे निवेदन बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष अमजद रंगरेज, शहराध्यक्ष इरफान शेख यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.
महापालिकेने आकारलेला कर नागरिक नियमित भरत असूनही ते अनेक मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत.
अनेक रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांना मणक्याचे विकार लागत आहेत. त्यामुळे रस्त्यांची दुरुस्ती तत्काळ करण्यात यावी. बर्‍याच भागात फक्त नगरसेवकांच्याच घराजवळील रस्ते नेहमी दुरुस्त केले जातात. इतर भाग दुर्लक्षित आहे. अमृत योजनेमुळे अनेक रस्त्यांवरील माती तशीच पडून असल्याने अपघात होत आहे. शिवाजीनगर भागातील मुख्य रस्ता, खत कारखाना रोड, आय.वाय.पार्क, उस्मानिया पार्क, अमन पार्क, उमर कॉलनी, अलिमियानगर, चिश्तिया पार्क, मोहम्मदियानगर, के.जी.एननगर-ते मुगल गार्डनपर्यंतच्या मुख्य रस्त्यांची अतिशय दुरावस्था झाली आहे. या रस्त्याची दुरुस्ती करुन डिव्हायडर व पथदिव्यांची व्यवस्था करण्यात यावी. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्वांच्या लसीकरणाची तातडीने सोय व्हावी.
निवेदन देणार्‍या शिष्टमंडळात, डॉ शाकीर शेख, विजय सुरवाडे, खुशाल सोनवणे, देवानंद निकम, सुनील देहडे, सिध्दार्थ सोनवणे, कुणाल सोनवणे, रियाज पटेल, सचिन सुरवाडे, शेख रहीम तांबोळी, सुकलाल पेंढारकर यांचा समावेश होता.